औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग सध्या वाऱ्यावर असल्यासारखे झाले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद या ७ जिल्ह्यांसाठी येथील प्रादेशिक विद्युत मंडळ कार्यालय जानेवारी २०२१ पासून नांदेडमध्ये सुरू झाले. तेव्हापासून येथील कामांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
औरंगाबादचे कार्यकारी अभियंता सु. वी. नंदनवनकर हे ३१ मार्चला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त पदभार १ एप्रिलपासून ए. बी. चौघुले यांना देण्यात आला. परंतु ते कार्यालयात चार्ज मिळाल्यापासून फक्त १ दिवस आले. त्यामुळे औरंगाबाद विभागाची सुमारे नऊ कोटींची विद्युत कामे प्रलंबित आहेत. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारती व परिसरातील विद्युत कामांत पथदिवे, वायरिंग, रोहित्र, जनरेटर, दुरुस्ती व नवीन उभारणी करणे, वायरमन पुरविण्याची कामे ठप्प आहेत. या सर्व कामांची अंदाजपत्रके तयार करणे, तांत्रिक मान्यता देणे, निविदा काढणे, कामे करणे, देयके देणे, फायर सेफ्टी ऑडिट करणे, खुलताबाद तालुका सत्र न्यायालयाची दीड कोटीच्या कामांना अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
फायर ऑडिटही ठप्प
कोरोनाच्या महामारीत हॉस्पिटल्सना आग लागण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे राज्याच्या सर्व विभागातील हॉस्पिटल्सचे ऑडिट करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सरकारी हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट करण्याची जबाबदारी विद्युत विभागाकडे आहे; परंतु जबाबदार अभियंते नसल्यामुळे या कामांना वेग मिळत नसल्याची ओरड होत आहे. दरम्यान, प्रभारी कार्यकारी अभियंता चौघुले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी रूजू झालो असून, सर्व कामांना लवकरच मंजुरी मिळेल.