वाळूज महानगर : येथून जवळच असलेल्या वडगावात घरगुती वीजग्राहकाला तब्बल दीड लाखाचे बिल महावितरणकडून पाठविण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वाळूजमहानगर परिसरात महावितरणच्या गलथान कारभाराला वीज ग्राहक कंटाळले असून, या भागात सर्रासपणे सदोष देयकाचे वाटप ग्राहकांना करण्यात येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे.
महावितरणच्या वाळूज सबस्टेशन अंतर्गत रांजणगाव, कमळापूर, जोगेश्वरी, वाळूज, नारायणपूर, शिवराई आदी तसेच सिडको वाळूजमहानगर अंतर्गत वडगाव, तीसगाव, साऊथसिटी, सिडको वाळूजमहानगर आदी ठिकाणी जवळपास ३५ हजार वीज ग्राहक आहेत. बहुतांश ग्राहकांना सदोष देयकाचे वाटप करण्यात येत असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
सदोष देयकांच्या दुरुस्तीसाठी अनेक ग्राहकांना वाळूज व सिडकोतील महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. विज बिल वेळेवर न भरल्यास नाहक दंडाची रक्कम भरावी लागत असल्याने ग्राहकांत नाराजीचा सूर उमटत आहे. याच बरोबर नवीन वीज मिटर घेणे, फॉल्टी मिटर बदलणे, विज बिलात दुरुस्ती करणे आदी कामासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी अडवणूक करीत असल्याची तक्रार ग्राहकांतून होत आहेत. वडगाव येथील कैलास गणपतराव मिरगे यांना महावितरणकडून १ लाख ५३ हजार २३० रुपयांचे वीजबिल पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वीच या ग्राहकाचे फॉल्टी मीटर बदलून देण्यात आले आहे. वीजबिल कमी करण्यात यावे, यासाठी मिरगे हे महावितरण कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. रांजणगाव येथील दादा राऊत या ग्राहकालाही त्याच्या भावाचे नावे असलेले मिटर स्वत:च्या नावावर करुन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रारही त्यांनी अनेकदा केली आहे.
दर महिन्यात शेकडो तक्रारीमहावितरण कार्यालयाकडे प्रत्येक महिन्यात १०० वर तक्रारी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी सिडकोचे उपअभियंता एस.एस.उखंडे म्हणाले की, ग्राहकांना तात्काळ सदोष देयकाची दुरुस्ती करुन दिली जात असून, या परिसरात जवळपास २२ हजार ग्राहक असल्यामुळे तक्रारीचे निवारण करताना विलंब होत आहे.------------------------------------