औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएलने मिळून ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर शहरातील नागरिकांना वीज बिल वाढीचा जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे वीज बिल वाढवून येणार हे निश्चित झाले आहे. त्याचा भुर्दंड वीज ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.शहराच्या हद्दीत महापालिकेकडून एलबीटी लावण्यात येते. महापालिकेच्या थकलेल्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीचा वाद सुरू होता. त्यामुळे १ एप्रिल २०१२ ते १० सप्टेंबर २०१३ या कालावधीतील एलबीटी थकली आहे. महापालिकेचे एलबीटीपोटी १२ कोटी रुपये जीटीएलकडे थकले आहेत. नुकतीच महावितरणने जीटीएलला स्थानिक संस्था कर वसुलीची परवानगी दिली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१२ ते १० सप्टेंबर २०१३ या कालावधीतील थकलेली एलबीटी दिवाळीच्या मुहूर्तापासून वसूल करण्यात येणार आहे. आॅक्टोबरनंतरचे वीज बिल दोन टक्के वाढवून येणार आहे. १७ महिन्यांत वीज ग्राहकांकडून एलबीटीच्या माध्यमातून कोट्यवधींची वसुली होणार आहे. महावितरण आणि जीटीएलने संयुक्तपणे दिवाळीच्या ‘गोड’ दिवसांमध्ये नागरिकांना भुर्दंड करण्याचा हा ‘कडू’ निर्णय घेतला आहे. एलबीटी वसुलीचा रखडलेला निर्णय ऐन सणाच्या मुहूर्तावर का घेतला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. वसुली पुढे सुरू राहणार महापालिकेच्या हद्दीतील वीज ग्राहकांकडून पुढील १७ महिने एलबीटी वसूल करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या एकूण वीज बिलामध्ये दोन टक्के बिल वाढवून येणार आहे. थकलेल्या एलबीटीची वसुली १७ महिन्यांत न झाल्यास वसुली पुढे सुरू राहणार आहे, असे महावितरणने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर वीज बिल वाढीचा झटका
By admin | Published: October 22, 2014 12:36 AM