औरंगाबाद : तिघाडी सरकारचे करायचे, खाली मुंडके वर पाय...ऊर्जामंत्री नितीन राऊत हाय हाय...आघाडी सरकार मुर्दाबाद... वीज बिल माफ झालेच पाहिजे, अशा घोषणा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी गारखेडा येथील महावितरणच्या सहायक अभियंता कार्यालयासमोर सक्तीची वीजबिल वसुली थांबविण्यासाठी हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी आ. अतुल सावे यांनी कार्यालयाच्या गेटला टाळे लावले.
महावितरणने जबरी वसुली थांबवावी, हप्ते पाडून द्या अथवा बिल माफ करा. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना मदत करण्याऐवजी त्रास देण्याच्या प्रकारचा निषेध करण्यात आला. भाजपच्या गारखेडा मंडळाकडून या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळातील १०० युनिटची सूट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली होती. ती दिली जात नाही. कोरोनामुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहेत. महावितरण कंपनीने ग्राहकांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवून त्यांना दिलासा द्यावा. आता केवळ टाळे लावून इशारा दिला आहे. नागरिकांना वीज बिलात सूट दिली नाही, तर आंदोलन तीव्र करू, असा इशारा आ अतुल सावे यांनी दिला. घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. आंदोलनावेळी आ. सावे यांनी कार्यालयाच्या गेटला टाळे लावले. काही वेळात आंदोलन संपल्यावर गेट अधिकाऱ्यांनी उघडले. यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष संजय केणेकर, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, लक्ष्मीकांत थेटे, विमल केंद्रे, मनीषा मुंडे, मनोज भारस्कर, गीता कापुरे, रामेश्वर दसपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
पन्नालालनगर कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन
पन्नालालनगर येथील महावितरण कार्यालयावर राजू शिंदे, जालिंदर शेंडगे यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करून वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी करण्यात आली. सुमारे अर्धा तास झालेल्या या आंदोलनात शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनात जालिंदर शेंडगे, संजय जोशी, अजय शिंदे, शंकर मात्रे, साधना सुरडकर, संतोष उदावंत, सागर नीळकंठ, बाळू गनकवार, आप्पासाहेब कीर्ती शाही, राजेंद्र वाहुळ, सलीम भाई, साहेबराव निकम, विजू पगारे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.