औरंगाबाद : महावितरणने वीज चोरांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेला यश आले आहे. औरंगाबाद व वैजापूर शहरात रिमोटद्वारे मीटर बंद करून जवळपास पाच लाख रुपयांची वीजचोरी केल्याची दोन प्रकरणे उघडकीस आली आहेत. वीजचोरी करणारांसह रिमोट पुरविणाऱ्या चार आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
औरंगाबादेतील जुनाबाजारात महावितरणचे पथक तपासणी करीत होते. अजीम कॉलनीतील वीज ग्राहक नजीमोद्दीन सिद्दीकी यांचे मीटर बंद असल्याचे दिसले. हे मीटर सिद्दीकी मोहंमद मुजफ्फरुद्दीन वापरत होते. मुजफ्फरुद्दीन यांना विचारले असता त्यांनी बाजूच्या खोलीतून लाल रंगाचे रिमोट आणून बंद असलेले मीटर चालू केले. दोन मजली घरासह दुकानातील ९ ट्यूब, ६ पंखे, २ फ्रीज, २ गिझर, २ वॉशिंग मशीन, १ डीप फ्रीझर, १ एअरकंडिशनर, १ इंडक्शन हीटर (शेगडी) व १ टीव्ही या उपकरणांचा वापर करून तब्बल २४ हजार ७०३ युनिट अर्थात ४ लाख ४६ हजार ७०० रुपये एवढी वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले.
महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता अभिजित सिकनीस, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी, सहायक अभियंता महेश सोनार, प्रधान तंत्रज्ञ सुनील राठोड, वरिष्ठ तंत्रज्ञ पुंडलिक चव्हाण, तंत्रज्ञ आय. एस. खान, विद्युत सहायक मनोज वसावे, नैना कुडमते यांनी ही कारवाई केली.
दुसरी कारवाई वैजापूरातील शिक्षक कॉलनीतील किसन सोनवणे यांच्यावर करण्यात आली. या वीज ग्राहकाने फेरफार करून मीटर रीडिंग बंद करण्याचे कीट बसवले होते. तो कीटच्या साह्याने रिमोटद्वारे वीजचोरी करीत असल्याचे पथकास आढळले. सोनवणे यांनी २७२८ युनिटची वीजचोरी केली असून, ही रक्कम ४३ हजार ५२८ रुपये एवढी आहे. या वीज ग्राहकास सुधीर लाळे याने रिमोट विकले होते. या दोघांवरही गंगापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.