परंडा : मेघगर्जना आणि वादळी वारे सुरू असतानाच अचानक वीज कोसळल्याने घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना तालुक्यातील दहिटणा येथे गुरुवारी दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. तालुक्याच्या काही भागात गुरुवारी दुपारपासूनच अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. वेगवान वारे वाहत असतानाच मेघगर्जनेला सुरूवात झाली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दहिटणा येथे शिवाजी गोविंद दाभाडे यांच्या घरावर अचानक वीज कोसळून घराने पेट घेतला. या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तूसह घरातील अन्नधान्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. दरम्यान, दुपारी घटना घडल्यानतंरही महसूल विभागाचा अधिकारी घटनास्थळी न पोहोचल्याने शेवटी जवळा जि.प. सदस्य दत्ता साळुंके यांनी तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. साळुंके यांनी घटनास्थळास भेट देऊन मंडळ अधिकारी टी. एम. आमले यांना पंचनामा करायला लावला. सांयकाळी साडेसहा वाजता मंडळ अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याने त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
वीज कोसळून घर खाक
By admin | Published: May 05, 2017 12:04 AM