परभणी : वेतनातून एक तृतीयांश रक्कम दंड म्हणून कपात केल्याच्या निषेधार्थ शहरातील चारही उपविभागातील अभियंते १९ सप्टेंबरपासून सामूहिक रजेवर गेले आहेत.वीज वितरण कंपनीने परभणी शहरातील सहायक आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातून एक तृतीयांश रक्कम दंड म्हणून कपात करण्याची अंतिम शिक्षा ठोठावली आहे. या संदर्भात अभियंत्यांनी २६ मे रोजी वीज वितरण कंपनीकडे खुलासा सादर केला होता. परंतु त्याची दखल घेतलेली नाही. आकारलेला दंड हा वस्तूस्थितीचा विचार न करता व अन्यायकारकपणे आकारला असून, त्याचा निषेध म्हणून झोन क्र.१, ३, ४ आणि ५ मधील कनिष्ठ व सहायक अभियंते १९ सप्टेंबरपासून सामूहिक रजेवर जात असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे रजा दिल्यानंतर या अभियंत्यांनी त्यांचे भ्रमणध्वनीचे सीमकार्डही अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांकडे सुपूर्द केले आहे. झोन क्र.१ चे सहायक अभियंता एस. ए. गव्हाड, झोन क्र.४ चे एस. बी. राठोड, झोन क्र.५ चे एन. डी. देशपांडे आणि झोन क्र.३ चे कनिष्ठ अभियंता आर. पी. घोडगे यांनी हे आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, अभियंत्यांनी सामूहकि रजा दिल्याने शहरातील वीज पुरवठ्यातील बिघाड व अन्य कामांवरही परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)
वीज कंपनीचे अभियंते गेले सामूहिक रजेवर
By admin | Published: September 19, 2014 11:58 PM