करमाड : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना तातडीने वीज कनेक्शन देण्याचे भाजपा सरकारचे धोरण कोलमडले असून, कोटेशन भरुन सुध्दा वीज जोडणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. परिणामी फळबागा जगवायच्या कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कृषी पंपासाठी नवीन वीज कनेक्शन मिळावे म्हणून २०१७-१८ आणि त्या पूर्वी करमाड परिसरातील अनेक गावच्या शेतकºयांनी महावितरणकडे कोटेशन भरले आहे.परंतु अद्याप या शेतकºयांना वीज कनेक्शन मिळाले नाही. दुष्काळी परिस्थिती असून, उपलब्ध असलेले पाणी विजेअभावी देता येत नसल्याने शेतकºयांनी लागवड केलेल्या आणि उत्पन्नाच्या भरात असलेल्या फळबागा संकटात सापडल्या आहेत.
सटाणा येथील माजी उपसरपंच अशोक वाघ म्हणाले की, आम्ही अनेकदा जिल्हा अधीक्षक अभियंता आकोडे यांच्याकडे विचारपूस केली असता टेंडर घेतले गेले नाही म्हणून वेळ लागत असल्याचे कारण सांगितले. हेच कारण गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळत असल्याने शासन धोरणाचे फलीत काय , असा सवाल उपस्थित होत आहे. कुठल्याही परिस्थितीत महावितरणने तातडीने वीज कनेक्शन द्यावेत अन्यथा महावितरण समोर उपोषण करण्याचा इशारा सटाणा गावचे माजी उपसरपंच अशोक वाघ, बाळू गोजे यांच्यासह शेतकºयांनी दिला आहे.