औरंगाबाद : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व टेबल रिकामे होते; पण तरीही विजेची उधळपट्टी मात्र सुरू होती. कार्यालयातील सर्वच शाखांमध्ये कर्मचारी उपस्थित नसताना दिवसभर दिवे आणि पंखे सुरूच होते.महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. हा संप आजही सुरूच होता. त्यामुळे दिवसभर कार्यालयात शुकशुकाट होता. कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनीही सकाळीच कार्यालय सोडले. परिणामी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडले होते. तरीदेखील कार्यालयात शेकडो दिवे आणि पंखे सुरूच होते. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी फेरफटका मारला असता हे चित्र दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यासह पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील विविध विभागात विजेची उधळपट्टी सुरू होती. तिन्ही मजल्यांवर पोर्चमधील सर्व दिवे सुरू होते. पहिल्या मजल्यावरील सामान्य प्रशासन शाखा, गृहशाखा, पुरवठा विभाग, भूसंपादन शाखा, नियोजन शाखा, रोजगार हमी शाखा, ग्रामपंचायत शाखा, नगरपालिका प्रशासन, अल्प बचत तसेच दुसऱ्या मजल्यावरील गौण खनिज विभाग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल, करमणूक कर शाखा, पुनर्वसन शाखा आदींमध्ये दिवसभर दिवे आणि पंखे सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच तहसील कार्यालयातही विजेची उधळपट्टी दिसून आली. संपामुळे तहसील कार्यालयातही दिवसभर कर्मचारी उपस्थित नव्हते. अधिकाऱ्यांच्या केबीनमध्येही झगमगाट रोजगार हमी योजनेच्या कामांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागात शासनातर्फे सेवानिवृत्त अधिकाऱ्याची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली जाते. सध्या हे पद रिक्त आहे.या विभागातही संबंधित अधिकाऱ्याच्या दालनात आज लखलखाट होता. दिव्यांबरोबच पंखेही सुरू होते.
विजेची उधळपट्टी...!
By admin | Published: August 03, 2014 1:02 AM