औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे मार्गावर एप्रिल २०१८ पासून विद्युतीकरणाचे काम सुरू होणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एकेरी मार्गावर विद्युतीकरण होईल. हे काम सुरू करण्यासाठी सध्या सर्वेक्षण सुरू असून, विद्युतीकरणाच्या कामाने इंजिन नादुरुस्तीच्या घटनांना कायमस्वरुपी आळा बसेल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा म्हणाले.
नांदेड विभागाच्या व्यवस्थापकपदी २२ नोव्हेंबर रोजी त्रिकालज्ञ राभा हे रुजू झाले. पदभार घेतल्यानंतर औरंगाबादेतील पहिल्या दौर्यात बुधवारी (दि.२०) मुख्य रेल्वेस्टेशन, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन आणि चिकलठाणा येथे पीटलाईनसंदर्भात पाहणी केली. पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना रेल्वेच्या विद्युतीकरणाविषयी त्यांनी माहिती दिली.
रेल्वे प्रशासनाकडून नांदेड- मुदखेड या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यात परभणी- मिरखेल या १७ किलोमीटर मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. नांदेड विभागात रेल्वेचे इंजिन नादुरुस्तीच्या घटनांचे प्रमाणही अधिक आहे. इंजिन नादुरुस्तीनंतर या मार्गावरील रेल्वेची वाहतूक ठप्प होते. इंजिन दुरुस्त होणे अथवा दुसरे इंजिन येण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे तासन्तास रेल्वे वाहतूक खोळंबते. गेल्या अनेक वर्षांपासून दुहेरीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे.
याविषयी त्रिकालज्ञ राभा म्हणाले, एप्रिलपासून विद्युतीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सुरुवातीचे काम आणि सर्वेक्षण सध्या सुरू आहे. विद्युतीकरणात वीज कोठून घ्यायची, रेल्वे मार्गावरील पूल, भुयारी मार्गांची स्थिती, उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांची स्थिती आदी गोष्टींचा आढावा घेतला जात आहे. दुहेरीकरणाच्या कामांबरोबरच एकेरी मार्गावर विद्युतीक रण होईल. दुहेरीकरणाने रेल्वेची संख्या वाढेल. तसेच क्रॉसिंगसाठी अधिक वेळ रेल्वे रोखण्याचा प्रकार थांबेल, असे ते म्हणाले.
मुकुंदवाडीचे काम महिनाभरातमुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवरील विकासकामे गेल्या अनेक महिन्यांपासून ‘स्लो ट्रॅक ’वर सुरू आहेत. येथील कामे आगामी महिनाभरात पूर्ण होतील. मुकुंदवाडी येथे भुयारी मार्ग होणे अवघड असल्याचे त्रिकालज्ञ राभा म्हणाले.
कामे पूर्ण करण्यास प्राधान्यऔरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील विविध सोयी-सुविधांची पाहणी करून राभा यांनी अधिकार्यांना विविध सूचना दिला. स्टेशनवरील परिस्थिती चांगली आहे. प्रवाशांनी ते अधिक चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सध्या अनेक प्रकल्प सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यास आधी प्राधान्य असल्याचे त्रिकालज्ञ राभा म्हणाले.