औरंगाबाद : मराठवाडा, विदर्भ तसेच खान्देशात उद्योगांसाठी वीजबिलांमध्ये दिली जाणारी १,२०० कोटींची अनुदानाची रक्कम मार्चपूर्वीच संपुष्टात आल्यामुळे जानेवारी महिन्याच्या बिलाची पूर्ण रक्कम भरण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. वीजबिलाच्या माध्यमातून उद्योजकांना बसलेला हा झटका असल्याचे मानले जाते.मराठवाडा, विदर्भ तसेच खान्देशात उद्योगवाढीसाठी चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने औद्योगिक वीज ग्राहकांना २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १,२०० कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. हे अनुदान वीजबिलात समाविष्ट केले जात असे. मात्र, २०२०-२१ या आर्थिक वर्षाची मंजूर अनुदानाची रक्कम डिसेंबरमध्येच संपल्यामुळे उद्योगांना जानेवारी महिन्याच्या वीजबिलामध्ये सवलत देण्यात आली नाही. यापुढील दोन महिन्यांच्या बिलात ही सवलत मिळेल की नाही, असा संभ्रम उद्योजकांत निर्माण झाला आहे.यासंदर्भात ‘सीएमआयए’चे अध्यक्ष कमलेश धूत व सचिव सतीश लोणीकर म्हणाले, लॉकडाऊनमध्ये कामगार, ट्रान्सपोर्टमुळे बसलेली आर्थिक झळ सहन करत हळूहळू उद्योग सुरू झाले. कोविडमुळे उद्योगाची विस्कटलेली घडी बसवत असताना शासनाकडे कोणतीही अतिरिक्त अनुदान किंवा मदतीची मागणी केलेली नाही. याउलट संकटाच्या काळात शासनाला वेळोवेळी मदतच केलेली आहे. अशावेळी अस्तित्वात असलेले अनुदान बंद करून उद्योजकांना वेठीस धरणे हे चुकीचे आहे. शासनाने वीजबिलासाठी वर्षाला किमान २ हजार कोटींचे अनुदान जाहीर करावे, अशी आमची मागणी आहे.
उद्योगांचे वीजबिलाचे कोट्यवधींचे अनुदान संपले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:23 AM