छत्रपती संभाजीनगर : शहागंज परिसरातील काचीवाड्यात राहणाऱ्या वीजग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून महावितरणचे ४६ हजार ७५० रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी सहायक अभियंता संभाजी अथरगण यांच्या फिर्यादीवरून वीजचोरावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणच्या शहागंज शाखेचे सहायक अभियंता संभाजी अथरगण व त्यांचे सहकारी प्रधान तंत्रज्ञ दत्तात्रय शिंदे, सचिन पांदे व इतर कर्मचारी हे काचीवाडा परिसरामध्ये मीटर तपासणी व पाहणी करण्यासाठी गेले होते, त्यावेळी चंद्रकांत बाबूराव इंगळे (घर क्र. १-२९-३१/पी, काचीवाडा) या ग्राहकाच्या वीजजोडणीची प्राथमिक पाहणी केली असता मीटरच्या पाठीमागील बाजूस छिद्र केल्याचे आढळून आले. मीटरमध्ये फेरफार केल्याचे दिसून आले. सदर मीटर तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले असता फेरफार केल्याचे सिद्ध झाले.
चंद्रकांत बाबूराव इंगळे याने महावितरणची २,६२१ युनिटची वीज चोरून वापरली. त्याची किंमत अधिभारासह ४६,७५० रुपये आहे. वीजचोरीचे ४६,७५० व तडजोडीचे २००० असे एकूण ४८,७५० बिल दिले असता इंगळेने ते भरण्यास टाळाटाळ केली. फिर्यादीवरून वीजचोरावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वीज कर्मचाऱ्यास शिवीगाळ, एकावर गुन्हा दाखलवीजबिल वसुलीस गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या नक्षत्रवाडी शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पाटील हे मंगळवारी दुपारी नक्षत्रवाडीतील ग्राहक विजय पाठे याचे बिल थकीत असल्याने बिल वसुलीसाठी गेले होते. बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला. त्यावरून विजय पाठेच्या भावाने पाटील यांना शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा आणला. पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.