लोकमत न्यूज नेटवर्कजालना : थकीत वीज बिलामुळे महावितरणने फिल्टरबेड व मस्तगड पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला होणारा पाणीपुरवठा रविवारी झाला नाही.नवीन जालन्याला घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा होतो. नगरपालिकेने येथील पंपहाऊसचे चालू महिन्याचे तीन लाखांचे बील थकविले आहे. ७० हजारांच्या थकबाकीसाठी जुना जालन्यातील मस्तगड पंपहाऊसचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. वीजबिलाच्या जुन्या व चालू थकबाकीचा आकडा दीड कोटीपर्यंत गेला आहे. थकीत बिलाचा भरणा झाल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. नवीन जालन्यात रविवारी झोननिहाय होणारा नियमित पाणीपुरवठा झाला नाही. जुना जालन्यातील काही भागात पाणी न आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. नवीन जालन्यात झोननिहाय होणारा पाणीपुरवठा तीन ते चार दिवस उशिरा होण्याची शक्यता असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या पालिकेला वीजबिलाची थकबाकी भरणे दिवसेंदिवस डोईजड होत आहे. काही दिवसांपूर्वी वीजबिल न भरल्यामुळे जायकवाडी-जालना योजनेचा अंबड जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला होता. खंडित वीजपुरवठ्याबाबत संदर्भात मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले, की पंपहाऊसचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी सोमवारी वीजबिल भरण्याचे नियोजन केले आहे.
पाणीपुरवठ्याची वीज खंडित, जालन्यात निर्जळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:01 AM