छत्रपती संभाजीनगर : केकत जळगाव येथे विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खा. संदीपान भुमरे रविवारी जिल्हा रुग्णालयात गेले. मात्र, येथील लिफ्ट बंद होती. त्यामुळे पायऱ्या चढून जावे लागले. लिफ्टविषयी नाराजी व्यक्त करत खा. भुमरे यांनी उपस्थित डॉक्टरांना धारेवर धरले. दोन वर्षांपासून भुमरे शासकीय दंत महाविद्यालयात गेले होते तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता.
जिल्हा सामान्य रुग्णालयात काही विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच खा. भुमरे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी या रुग्णालयाला भेट दिली तेव्हा लिफ्ट बंद होती. त्यामुळे पायऱ्या चढून त्यांना वरच्या मजल्यावर असलेल्या ‘एनआरसी’पर्यंत जावे लागले. लिफ्ट बंद असल्याने रुग्णांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागते. ही बाब पाहून भुमरे यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांच्याशी संपर्क साधला असता, सर्व लिफ्ट सुरु आहेत. नेमके काय झाले, याची चौकशी केली जाईल.
ऑक्टोबर २०२२ मध्ये काय घडले होते?पालकमंत्री असताना ऑक्टोबर २०२२ मध्ये भुमरे दंतोपचारासाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गेले होते. उपचार सुरू असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यावेळी मोबाइलच्या उजेडात भुमरेंवर उपचार करण्यात आले होते. या घटनेनंतर शासकीय दंत महाविद्यालयास जनरेटर देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अखेर काही दिवसांपूर्वीच जनरेटर दाखल झाले.
मुलांच्या प्रकृतीची विचारपूसविषबाधा झालेल्या काही मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना पाहण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेलो. मुलांची प्रकृती चांगली आहे. रुग्णालयात गेलो, तेव्हा तेथील लिफ्ट बंद होती. काही तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट बंद पडली असेल.- संदीपान भुमरे, खासदार