औरंगाबाद : नांदेड ते मनमाडपर्यंतच्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल ( Electrification of Nanded-Manmad railway) . दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी आहे. शिवाय, या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी जुनी आहे आणि मी याच कामाचा पाठपुरावा करीत आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) यांनी बुधवारी रेल्वेच्या बैठकीत सांगितले. सर्व प्रलंबित मागण्यांसाठी अधिवेशन काळात दिल्लीत मराठवाड्यातील ( Marathwada ) खासदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाची बैठक प्रथमच औरंगाबादेत घेण्यात आली. यावेळी राज्यमंत्री दानवे म्हणाले, फायद्यात नसलेले रेल्वेमार्ग आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा दिला पाहिजे. त्यासाठी सर्वजण मुख्यमंत्र्यांना भेटू. बैठकीत उपस्थित खासदारांनी आपल्या मागण्या मांडल्यानंतर रावसाहेब दानवे म्हणाले, यापूर्वी खासदार म्हणून बैठकीत मुद्दे मांडत होतो. आज मंत्री म्हणून आलो आहे. मराठवाड्याच्या रेल्वे विकासासाठी प्रयत्न केला जाईल. राज्य सरकारकडे काही विषय प्रलंबित आहेत. नवीन रेल्वेमार्ग आणि भुयारी मार्गांच्या कामात राज्याचा वाटा असतो.
मुदखेड - परभणी काम पूर्ण‘एससीआर’च्या अधिकार क्षेत्रात महाराष्ट्रासाठी ४ हजार २६४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या कामांमध्ये २६३ कि.मी. दुहेरी लाईन, ४२ कि.मी. तिसरी लाईन आणि ९३० किलोमीटरच्या विद्युतीकरणाचा समावेश आहे. ८१ किलोमीटर लांबीच्या मुदखेड-परभणीदरम्यानच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. यावेळी दानवे म्हणाले, अकोला-अकोटदरम्यान ४३ कि.मी. गेज रूपांतराचे कामही पूर्ण झाले आहे. ३४ कि.मी. अंतरासाठी अकोला-लोहगडदरम्यान विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. भारतीय रेल्वे सुरक्षेशी संबंधित पायाभूत कामांना प्राधान्य देते. ज्यात भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल यांचा समावेश आहे. औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वेगेटवर कॉस्ट शेअरिंग तत्त्वावर भुयारी मार्ग केला जाईल. बीड-परळीदरम्यान ३० कि.मी. अंतरासाठी नवीन रेल्वे लाईनचे काम पूर्ण झाले आहे आणि चालू आर्थिक वर्षात ३० किलोमीटरचा आणखी एक भाग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असेही दानवे म्हणाले.
औरंगाबाद-चाळीसगाव हा मार्ग फायद्याचा नाहीपॅसेंजर रेल्वे फायद्यात नाही; कारण एक रुपया खर्च केल्यानंतर ४८ पैशांचे नुकसान होते. हे नुकसान मालवाहतुकीतून भरून काढले जाते. मात्र, चाळीसगाव येथे मालवाहतूक नसल्याने औरंगाबाद-चाळीसगाव हा मार्ग फायद्याचा नाही. त्यासाठी राज्य सरकारने वाटा वाढवून दिला तरच शक्य होईल. राज्यानुसार झोन झालेले नाहीत. नांदेड विभाग मध्य रेल्वेतून काढण्यासाठी रेल्वे बोेर्डाशी चर्चा केली जाईल. पुण्याला जाण्यासाठी नांदेडहून रेल्वे सुरू केली जाईल, असे दानवे म्हणाले.