छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे धावण्याची चाचणीही यशस्वी झाली.
नव्या वर्षाच्या प्रारंभी म्हणजे जानेवारीत मनमाड ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी.च्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते जालन्यापर्यंतच्या विद्युतीकरणाच्या कामाला वेग देण्यात आला. यात आता बदनापूरपर्यंत म्हणजे आणखी ४३ कि.मी. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाले. छत्रपती संभाजीनगर ते बदनापूरपर्यंत शुक्रवारी इलेक्ट्रिक इंजिनसह रेल्वे चालविण्याची चाचणीही घेण्यात आली. आगामी महिनाभरात जालन्यापर्यंतचे काम पूर्ण होईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.