औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कची इलेक्ट्रॉनिक्स झोन म्हणून निवड करण्यात आली असून, स्टरलाईटचा प्रकल्प याठिकाणी आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, असे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे सांगितले.अ. भा. ब्राह्मण महासंघाच्या ब्राह्मण उद्योग संमेलनाचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पेट्रोलियम पदार्थानंतर भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची भारतातच निर्मिती व्हावी, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यासाठी शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कमध्ये इलेक्ट्रॉनिक्स झोन निर्माण केला जाणार आहे. जगभरातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या येथे याव्यात, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्टरलाईट टेक्नॉलॉजीज्चा भारतातील पहिला ‘एलसीडी’ निर्मिती प्रकल्प औरंगाबादेत आणण्याचे प्रयत्न केले जात असून, याबाबत कंपनीशी प्राथमिक बोलणीदेखील झाली आहे, असे देसाई यांनी सांगितले.चिकलठाण्यातून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे‘डीएमआयसी’ तसेच ड्रायपोर्टमुळे औरंगाबादच्या विकासाला चालना मिळेल. चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची ये-जा सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने उद्योगांची भरभराट होईल. त्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण गरजेचे आहे. विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली असून, लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. शेंद्र्यात आॅईल डेपोमराठवाड्याला मनमाडजवळील पानेवाडी येथून पेट्रोल, डिझेल, रॉकेलचा पुरवठा केला जातो. ही बाब खर्चिक ठरत असल्याने शेंद्र्यात स्वतंत्र आॅईल डेपो सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे देसाई यांनी सांगितले.ब्राह्मणांनो न्यूनगंड बाळगू नकामहाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. मनोहर जोशी यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने दुसऱ्यांदा राज्याला ब्राह्मण मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनी कसलाही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास, स्वाभिमानाने पुढे गेले पाहिजे, असे सुभाष देसाई यांनी नमूद केले. ब्राह्मण समाजाला उद्योगांची मोठी परंपरा लाभली आहे. किर्लोस्कर, बडवे आदींचे उद्योग सुरुवातीला सूक्ष्म होते. त्यानंतर त्यांचा वटवृक्ष झाला. त्यामुळे आपला उद्योग लहान असल्याची खंत बाळगू नका. आज छोटा असणारा तुमचा उद्योग भविष्यात निश्चित मोठा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्याने सुरू झालेल्या लघु उद्योगांपैकी ३० टक्के उद्योगच पुढे टिकतात. ७० टक्के उद्योग अडचणींमुळे बंद पडतात. हे उद्योग पुन्हा सक्षम करण्याची जबाबदारी ब्रह्मोद्योग संघटनेने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. खा. चंद्रकांत खैरे, चितळे उद्योग समूहाचे नानासाहेब चितळे, बडवे उद्योग समूहाचे श्रीकांत बडवे, आ. संजय शिरसाट, आ.अतुल सावे, अ. भा. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, रवींद्र वैद्य, रेणुकादास वैद्य, विश्वजित देशपांडे, अनिल मुळे आदी उपस्थित होते.