लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्याविरोधात राजकीय वातावरण तयार होत असून त्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठकही झाली. विशेष म्हणजे या बैठकीस सत्ताधारी आमदारही उपस्थित होते. मात्र त्यांची भूमिका संदिग्ध होती.शिवसेनेसोबत पालकमंत्र्यांचे आधीच वाकडे आलेले आहे. त्यांनी वारंवार केलेल्या वक्तव्यांवरून या दोन पक्षांतील दरी येथे वाढलेली आहे. त्यात आता काँग्रेस व राष्ट्रवादीचीही भर पडली आहे. विविध विकास कामांसाठी एकतर निधी येत नाही, म्हणून पालकमंत्र्याविरुद्ध ओरड आधी होती. जिल्ह्याच्या विकासासाठी निधीच्या केवळ पोकळ घोषणा होतात. मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. बऱ्याच दिवसांपासून यावरून आमदार मंडळीही ओरड करीत होती. मात्र आता त्याला धार येत आहे. जिल्हा नियोजनसह विविध योजनांमध्ये पालकमंत्री सत्ताधारी व विरोधक असा भेद यापूर्वी कधी करीत आले नाहीत. आता तो होत आहे. शिवाय सत्ताधारीही खूश नसून त्यांच्या कामांतही हस्तक्षेप वाढल्याचा आरोप आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी कुठेतरी एकत्र येवून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची २७ जून रोजी भेट घेण्याची तूर्त भूमिका घेतलेली आहे. वार्षिक निधी व इतर काही प्रश्न मांडणार आहेत. तसेच निधी देताना हिंगोली जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचे गाऱ्हाणेही त्यांच्याकडे मांडले जाणार आहे. तर भविष्यात पालकमंत्र्यांच्या कारभारात सुधारणा न झाल्यास मात्र ही मंडळी एल्गार पुकारण्याची तयारी करीत आहे. विशेष म्हणजे यावेळी अनेक जि.प.सदस्यही उपस्थित होते. खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते यांनी आधीच मोट बांधली होती. त्यात नंतर आ.तान्हाजी मुटकुळे यांचाही सहभाग थोडाबहुत का होईना, दिसून येत आहे. आगामी काळात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांतून तरी यावरून ठिणग्या उडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
पालकमंत्र्यांविरुद्ध एल्गाराची चिन्हे
By admin | Published: June 22, 2017 11:21 PM