वेळापत्रक जाहीर : अभ्यासक्रम कपातीबाबत अद्याप ठोस उत्तर नाही
औरंगाबाद : केंद्रीय ऑनलाईन अकरावी प्रवेशाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राध्यान्य फेरी बुधवारपासून सुरू होत आहे. आतापर्यंत ३ फेऱ्यांसह २ विशेष फेऱ्या पार पडूनही शहरातील ११६ महाविद्यालयांत १५ हजार ६३७ जागा रिक्त राहिल्या आहेत. ३१ हजार ४७० प्रवेश क्षमता असलेल्या महाविद्यालयात पाचव्या फेरीअखेर १५ हजार ८३३ प्रवेश निश्चित झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली.
दहावीत ४५०पेक्षा अधिक गुण असणाऱ्यांसाठी १३ ते १५ जानेवारी, ४००पेक्षा अधिक गुण असणाऱ्यांसाठी १६ ते १८ जानेवारी, ३०० पेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१ ते २२ जानेवारी, २५० पेक्षा अधिक गुण असणाऱ्यांकरिता २३ ते २५ जानेवारी, दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्वांसाठी २७ ते २८ जानेवारी आणि एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी २९ ते ३० जानेवारी दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. संकेतस्थळावर याविषयीचा तपशिल जाहीर करण्यात आला असून, ३१ जानेवारीला रिक्त पदांचा तपशिल जाहीर केला जाणार आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबत चाललेली असताना अद्याप अभ्यासक्रम कपातीबाबत कोणतेही ठोस उत्तर शिक्षण विभागाकडे नाही, तर दुसरीकडे परीक्षा मंडळाकडून दहावी व बारावीच्या पूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्नसंच निर्मितीचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांतही अद्याप अभ्यासक्रमाबाबत संभ्रम कायम आहे.
---
दहावी बारावीचे पेपर ऑफलाईन
पुणे येथे शनिवारी झालेल्या बैठकीत दहावी व बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्यासंदर्भात राज्य मंडळाचे चेअरमन दिनकर पाटील यांनी निर्णय घेतला आहे. परीक्षेचे वेळापत्रक तयार करून त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडे पाठवले आहे. त्यावर निर्णय झाल्यानंतर ते जाहीर होईल, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.
----
पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्याची तयारी
नववी ते बारावीचे वर्ग जिल्ह्यात सुरू झाले असून, विद्यार्थीसंख्या वाढायला सुरुवात झाली आहे. आता २६ जानेवारीच्या अगोदर किंवा नंतरच्या काही दिवसांत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासंदर्भात निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तपासणीच्या नियोजनासंदर्भात सूचना दिल्या जातील. १८ ते २५ जानेवारी दरम्यान हे वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा सुरू असून, यासंदर्भात निर्णय होताच पुढील कार्यवाही होईल.
- डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परिषद, औरंगाबाद