औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी सोमवारपासून (दि.२२) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला आॅनलाईन अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा उर्वरित भाग-२ भरण्यात येईल, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली.शासनाने राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह औरंगाबाद शहरातील महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांपासून औरंगाबाद शहरातील महाविद्यालयांत अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने होत आहेत. मात्र, दोन्ही वर्षी ही प्रवेश प्रक्रिया गोंधळाची राहिली आहे. यात नियोजनाचा अभाव, विद्यार्थ्यांना योग्य माहिती आणि नियोजित वेळेत प्रवेश प्रक्रिया होत नसल्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील जागा रिक्त राहिल्याचा प्रकार दोन्ही वर्षी घडला आहे. यामुळे येत्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. यावर्षी अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी सुधारित कार्यपद्धती अवलंबिण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून प्राप्त झालेली कॉलेज प्रपत्रामधील शाखानिहाय तुकड्या, अनुदानित, विनाअनुदानित, कायम अनुदानित, कायम विनाअनुदानित, वर्गनिहाय व शाखानिहाय विद्यार्थी प्रवेश क्षमता, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेले विषय इत्यादी महाविद्यालयाने नोंदणी अर्जामध्ये नमूद केलेली माहिती तपासून शिक्षण संचालक यांनी निश्चित केलेल्या आॅनलाईन सेवा पुरवठादारास विहित कालावधीत उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सोमवारपासून अर्जप्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सुरुवातीस अर्ज भाग-१ भरता येणार आहे, तर दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर अर्ज भाग-२ भरता येणार असल्याचे डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
अकरावीची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:17 PM
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये ११ वीच्या प्रवेशासाठी सोमवारपासून (दि.२२) आॅनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला आॅनलाईन अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा उर्वरित भाग-२ भरण्यात येईल, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी दिली.
ठळक मुद्देनियोजन : दोन वर्षांच्या गोंधळानंतर यावर्षी सुरळीत पार पडण्याची आशा