छत्रपती संभाजीनगर : राज्यात होत असलेल्या एल्गार सभांतून मंत्री छगन भूजबळ हे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात दंगली व्हाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचे सभेतील नेत्यांच्या भाषणांतून दिसत असल्याने या सभांना आता दंगल सभा म्हणायला हवे, अशी टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर केला.
अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे पाटील हे शनिवारी रात्री शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले .डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस रुग्णालयात राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. रविवारी हिंगोली येथे ओबीसींचा एल्गार मेळावा झाला, या मेळाव्यात भूजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. यापार्श्वभूमीवर जरांगे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला , ते म्हणाले की, अंतरवाली सराटी येथे पेालिसांनी आमच्यावर अमानुष लाठीहल्ला आणि गोळीबार केला. ही चुक झाल्याचे मान्य करीत गृहमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही गुन्हे मागे घेण्यात येईल असे सांगितले होते.आता मात्र पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे.
सरकारने शब्द दिला होता. मात्र, आता सरकारचं नेमकं अटक करण्याचे कारण काय, यात मी सखोल जाणार आहे. अटक का केली याची जालन्याला गेल्यानंतर माहिती घेतल्यानंतर अधिकृतपणे बोलेन. परंतु सरकारला विनंती आहे, समाजात रोष वाढवू नका, विनाकारण अटक करु नका, साखळी आणि आमरण उपोषण करणाऱ्या मराठा बांधवांना त्रास होता कामा नये, त्यावर लक्ष द्यावे. हे आंदोलन आता अधिक व्यापक झाले आहे. त्यामुळे गुन्हे दाखल केल्याने मराठा समाज खचेल हा गैरसमज आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे सरकणार नाही.
बीड मधील भूजबळांच्याच नातेवाईकांनीच हॉटेल पेटविली
बीड मध्ये झालेल्या जाळपोळीसारख्या हिंसक घटनेचे समर्थन केले नाही. मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी भूजबळ यांच्याच नातेवाईकांनी स्वत:ची हॉटेल पेटविल्याचा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला. कायदेशीर पदावर असलेल्या भूजबळ हे बीड येथे जाळपोळीची पहाणी करण्यासाठी गेले होते. अंतरवाली सराटी येथे पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या माझ्या,माय, माऊली दिसल्या नाहीत. कारण त्यांना मराठा समाजाबद्दल प्रचंड आकस असल्याचा आरेाप जरांगे यांनी केला.
आंबेडकरांचा सल्ला जरांगेंना मान्यप्रकाश आंबेडकर यांनी सल्लागारांचे ऐकू नका, असा सल्ला आपल्याला दिला आहे. यावर जरांगे पाटील म्हणाले, मी कुणाचाही सल्ला मानत नाही. मला कोणीही काही सल्लागार नाही. कोणाता सल्लागार माझ्याकडे टिकतही नाही. परंतु मी प्रकाश आंबेडकर हे स्पष्ट बोलणारे आणि कायद्याचे अभ्यासक आहे. त्यांचा आम्हाला पाठींबा देखील असल्याने त्यांचा सल्ला आपल्याला मान्य असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.