औरंगाबाद : हॉस्पिटलमध्ये मानवता धर्म मुख्य असतो, धार्मिक क्षेत्रात आध्यात्मिक धर्म मुख्य मानला जातो, तसेच पत्रकारांमध्ये पत्रकारिता धर्म पाळला जातो. पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य समोर आणून लोकांच्या मनातील भ्रम दूर करा, असे प्रबोधन करीत युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. यांनी लोकमत परिवाराशी संवाद साधला.
सकल जैन समाजांतर्गत श्वेतांबर वर्धमान जैन स्थानकवासी संघातर्फे आयोजित होळी चातुर्मास महोत्सवासाठी युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा आदिठाणा यांचे औरंगाबादेत आगमन झाले आहे. महाराजांनी गुरुवारी (दि.५) दुपारी ४ वाजता लोकमत भवनला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकमत परिवाराशी संवाद साधला. हितेंद्रऋषीजी म.सा., अमृतऋषीजी म.सा., महासती पीयूषदर्शनाजी म.सा., रुचकदर्शनाजी म.सा. यांची यावेळी उपस्थिती होती.
प्रारंभी, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी साधू व साध्वीजींचे स्वागत केले. युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. म्हणाले की, पत्रकारितेच्या परिसरात आज आलो आहे. लोकमत हा संदेश देणारा ‘शब्द’ बनला आहे. लोकांच्या भावना त्यांचे विचार समजून ते अभिव्यक्त करणे, लोकांच्या भावना, विचारांना खऱ्या दिशेने पुढे नेण्याचे कार्य पत्रकारितेद्वारे केले जाते. लोकशाहीतील वर्तमानपत्र हे सर्वात मोठे व सशक्त माध्यम आहे. नवीन पिढी उच्चशिक्षण घेत आहे. शिक्षणाची टक्केवारी वाढली आहे. यामुळे आता वर्तमानपत्राचे महत्त्व, जबाबदारी खूप अधिक प्रमाणात वाढली आहे. सर्वत्र निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा काळात अंधारात आशेचे किरण वर्तमानपत्र बनले आहे. आशा व विश्वासाचे मोठे कार्य वर्तमानपत्राद्वारे केले जात आहे. युवाचार्यांनी पुढे सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. भीतीपेक्षा भ्रम जास्त पसरला आहे. वर्तमानपत्रांनी सत्य समोर आणून लोकांच्या मनातील भ्रम दूर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सर्वांच्या विचाराचा सन्मान करणारा ‘लोकमत’लोकमत परिवार सर्वांच्या विचाराचा सन्मान करतो. विभिन्न धर्मांचे लोक येथे एकत्र काम करतात. एकमेकांच्या धर्माचा, संस्कृतीचा ,परंपरेचा सन्मान केला जातो. पत्रकारिता हाच येथील धर्म आहे. एक प्रगल्भ विचाराची संस्कृती येथे पाहावयास मिळते, असे गौरवोद्गार युवाचार्य महेंद्रऋषीजी म.सा. यांनी काढले.