औरंगाबाद : दिवाळीनिमित्त सुटी असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथील जगप्रसिध्द वेरूळ लेणी पाहण्यासाठी येत आहेत. यामुळे येथील परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
दिपावलीच्या सुट्ट्यामुळे पर्यटक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहे. धार्मिक स्थळावर पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. यामुळे वेरूळ लेणी, दौलताबाद देवगिरी किला, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर, खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदिर येथे पर्यटक व भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे. वाढत्या गर्दीमुळे मात्र पुरातत्व विभागाचे नियोजन काही अंशी कोलमडल्याचे चित्र आहे.
सकाळपासूनच लेणी बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याने तिकिटघरावर एकाचवेळी पर्यटकांची तोबा गर्दी बघावयास मिळत आहे. तसेच पर्यटकांच्या गर्दीने वाहनतळात वाहने लावण्यास जागा मिळत नाही. अनेकांनी रस्त्यावर वाहने उभी केली होती. त्याचबरोबर वाहनांच्या गर्दीने लेणी समोर तसेच खुलताबाद घाटात ट्रँफीक जाम झाल्याने पर्यटक व भाविकांची गैरसोय झाली. मात्र पर्यटकांच्या गर्दीने व्यावसायिक आनंदी आहेत.