ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद, दि. २९ : औरंगाबाद महापालिकेत एमआयएमने पहिल्यांदाच निवडणूक लढवून २५ नगरसेवक निवडून आणले होते. मागील वर्षी बुढीलेन येथील नगरसेविका शकीला बेगम यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांना नगरसेवकपद गमवावे लागले. त्यानंतर शनिवारी एमआयएमचे दुसरे नगरसेवक जमीर कादरी यांचेही जात प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले. त्यामुळे अल्पावधीत एमआयएम पक्षाला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
वॉर्ड क्र. १९ आरेफ कॉलनी- प्रगती कॉलनी या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षीत वॉर्डातून जमीर कादरी यांनी एमआयएमच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. कादरी यांना १६३३ तर त्यांचे अपक्ष प्रतिस्पर्धी वाहेद अली यांना ११७६ मते पडली होती. राष्ट्रवादीचे नासेर चाऊस यांना ८८२ मते पडली होती. मतांच्या विभाजनात जमीर कादरी ४५७ मतांनी विजयी झाले होते. निवडणूक झाल्यापासून त्यांचे प्रतिस्पर्धी वाहेद अली यांनी जमीर कादरी यांच्या जात प्रमाणपत्रला आव्हान दिले होते.
सिटीचौक पोलीस ठाण्यात कादरी यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले आहेत. वाद खंडपीठातही पोहोचला. न्यायालयाने ३० जानेवारी २०१७ रोजी कादरी यांचे जात प्रमाणपत्र पुन्हा एकदा पडताळणी समितीकडे पाठवून दिले. औरंगाबादच्या तहसीलदारांनी छप्परबंद (विमुक्त जाती) हे प्रमाणपत्र दिले होते. सोबत पुरावे सशक्त नसल्याने जातीचा दावा अवैध ठरविला. हा निर्णय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष पी.टी. वायचळ, सदस्य सचिव डी.बी.खरात, सदस्य यु. एम. घुले यांनी हा निर्णय घेतला.
जात पडताळणी समितीच्या महत्वपूर्ण निर्णयामुळे आरेफ कॉलनी वॉर्डात पुन्हा एकदा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. मागील वर्षी एमआयएमला बुढीलेन वॉर्डात पोटनिवडणूकीला सामोरे जावे लागले होते. या वॉर्डात राष्टÑवादी काँग्रेसच्या परवीन कैसर खान निवडून आल्या. एमआयएमला बुढीलेन हा गढ राखता आला नाही. आता आरेफ कॉलनीतही एमआयएमला आपली जागा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.