छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा शिंदे गट शिवसेनेला मिळाली असून शिवसेनेने आज जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली. भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमधील रस्सीखेच संपली. तसेच पक्षांतर्गत उमेदवारीवरून सुरू असलेल्या विविध नावाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप कडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला होता. भाजपकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड मागील दोन वर्षापासून तयारी करीत होते. तर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे देखील शिवसेनेत बंड झाल्यापासून लोकसभेच्या तयारीला लागले होते. हा मतदारसंघ मिळावा, यासाठी भाजपने दोन वर्षात पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा घेतल्या होत्या. मात्र शिंदेसेनेकडून औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला जोरकसपणे लढविला. यामुळे आज अखेर भाजपने शिंदेसेनेला औरंगाबाद मतदारसंघ देऊन टाकला. यानंतर शिंदेसेनेने शनिवारी सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली.
जंजाळ यांची सोशल मिडियातून खंतभुमरे यांच्यासोबत शिंदेसेनेकडून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ इच्छुक होते. मात्र पक्षाचाच उमेदवार द्या, अशी भूमिका पक्षाच्या आमदारांनी घेतल्याने विनोद पाटील यांचे नाव मागे पडले. तर जंजाळ यांनी त्यांच्याकडे गॉडफादर आणि पैसा नसल्याने ते उमेदवारीच्या रेसमध्ये मागे पडल्याचे सोशल मिडियावर पोस्ट टाकून खंत व्यक्त केली. काहीवेळाने जंजाळ यांनी ही पोस्ट डिलिट केली.