औरंगाबाद : दुचाकी वाहन दालनाच्या व्यवस्थापकाने ११ लाख १६ हजार ७४५ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी व्यवस्थापक सोहनलाल प्रेमराज चव्हाण (६५, रा. सातारा परिसर) याच्याविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार सुमीत दिलीप सोनी यांचे बायपासवर एका कंपनीच्या वाहनांचे शोरुम आहे. चव्हाण हा त्यांच्याकडे २०१७पासून अकाऊंट व्यवस्थापक होता. दालनात जमा होणारी सर्व रक्कम त्याच्याकडे जात असे. ही रक्कम बॅंक खात्यात जमा करण्याची त्याची जबाबदारी होती. गतवर्षी सोनी यांनी त्यांच्या दालनाच्या व्यवहाराचे लेखापरीक्षण केले, तेव्हा त्यांना ११ लाख १६ हजार ७४६ रुपयांचा घोळ दिसून आला. विशेष म्हणजे हे लेखापरीक्षण आरोपीच्या उपस्थितीत झाले. यामुळे तक्रारदार यांनी त्यांना जाब विचारला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्यांचा आरोपीवरील संशय बळावल्याने त्यांनी शोरुमचे नव्याने लेखापरीक्षण केले असता, दालनात आलेले ११ लाख १६ हजार ७४५ रुपये चव्हाण याने कुणालाही दिले नाहीत आणि खात्यातही जमा झाले नसल्याचे दिसून आले. हा प्रकार समोर आल्यापासून चव्हाण हा कामावर आलेला नाही. याप्रकरणी सुमीत सोनी यांनी २५ मे रोजी सातारा पोलीस ठाण्यात चव्हाणविरूध्द गुन्हा नोंदवला असून, फौजदार विक्रम वडणे अधिक तपास करत आहेत.