लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकाऱ्यांची पाच पदे रिक्त असल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे़ परिणामी कामकाज खोळंबून गेले आहे़ दोन महिन्यांपूर्वी राज्यातील उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले़ या आदेशानुसार परभणी येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नांदेडहून अंकुश पिनाटे यांची बदली झाली़ तसेच भुसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारीपदी औरंगाबाद येथील अण्णासाहेब शिंदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून संजय पुंडेटकर तर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून मुंबई येथून अनभोेरे यांची बदली परभणी येथे करण्यात आली आहे़ या चार अधिकाऱ्यांच्या बदल्या परभणी जिल्ह्यासाठी झाल्या असल्या तरी केवळ दोन अधिकारी आतापर्यंत रूजू झाले आहेत़ दोन अधिकाऱ्यांनी रूज होण्याचे टाळले आहे तर उर्वरित तीन पदांवर एकही अधिकाऱ्याची नियुक्ती नसल्याने ही पदे रिक्त आहेत़ उपजिल्हाधिकाऱ्यांची ११ पदे परभणी जिल्ह्यात मंजूर आहेत़ त्यापैकी निम्मी पदे रिक्त आहेत़ त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दोन-तीन विभागांचा कार्यभार देण्यात आला आहे़ परिणामी हे अधिकारी संबंधित विभागात पूर्ण क्षमतेने कामकाज करू शकत नाहीत आणि कामे खोळंबत असून, अधिकाऱ्यांवर ताणही वाढत आहे़ १५ दिवसांपूर्वी नांदेड येथून निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून अंकुश पिनाटे हे रूजू झाले आहेत तर शुक्रवारीच सोलापूर येथून संजय पुंडेटकर हे रूजू झाले आहेत़ त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा पदभार आहे़ भूसंपादन विभागात बदली झालेले अण्णासाहेब शिंदे दोन महिन्यानंतर अद्यापही रूजू झाले नाही तर पुरवठा अधिकारी म्हणून बदली झालेले अनभोरे हे देखील रुजू झाले नाहीत़ निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची नांदेड येथे बदली झाली असून, ते कार्यमुक्त झाले आहेत़ तसेच पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील महेंद्रकर हे देखील कार्यमुक्त झाले असून, शुक्रवारी सेलूचे उपविभागीय अधिकारी पी़एस़ बोरगावकर यांनाही कार्यमुक्त करण्यात आले आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी, पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी सेलू अशी ५ पदे रिक्त आहेत़ त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे इतर काही विभागांचा पदभार दिला आहे़ रिक्त पदांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे़
रिक्त पदांमुळे वाढला ताण
By admin | Published: July 17, 2017 12:08 AM