छत्रपती संभाजीनगर : मागील अनेक वर्षांपासून मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांचे जन्मगाव असलेल्या अंबाजोगाई (जि. बीड) येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, ९ मार्च २०२३ रोजी विधानसभेतील अर्थसंकल्पात मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर, (जि. अमरावती) येथे स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या घोषणेनंतर विद्यापीठ स्थापनेसाठी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्यामुळे आता मराठवाड्यातील अंबाजोगाईऐवजी विदर्भात मराठी भाषा विद्यापीठ होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे पडसाद मराठवाड्यातील साहित्यिकांमध्ये उमटले आहेत.
मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांनी 'विवेकसिंधू’ हा पद्यग्रंथ १११० साली अंबाजोगाई येथे लिहिला. त्यांची समाधी अंबाजोगाई येथे असल्यामुळे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना अंबाजोगाईत करण्याची मागणी आहे. त्याशिवाय मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अमेरिका येथील सॅनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाई येथे व्हावे, असा ठराव मंजूर केला होता. त्याशिवाय अनेक अ. भा. मराठी साहित्य संमेलनांत मराठी भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे करण्याचा ठराव घेतले. या सर्व बाबींना केराची टोपली दाखवत मराठीतील आद्य गद्यग्रंथ लीळाचरित्राचे लेखन ज्या ठिकाणी झाले, त्या रिद्धपूर (जि. अमरावती) येथे करण्याची घोषणा झाली.
मराठवाड्यातील पुढाऱ्यांमुळे गेले...मराठवाड्यातील पुढाऱ्यांना कोणत्या गोष्टीचे महत्त्व वाटतच नाही. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यासह अशोक चव्हाण यांना मराठी भाषेचे विद्यापीठ अंबाजोगाईत होण्यासाठी अनेक पत्रे लिहिली. मात्र, त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भात घेऊन गेले. त्यांच्या विरोधात कोण बोलणार? अंबाजोगाईतील अमर हबीब, दगडू लोमटे यांनी स्थानिक नगरपालिकेचा ठराव घेऊन पाठपुरावा केला. पण त्याची कोणी दखल घेतली नाही. आम्ही बोलू शकतो, मांडू शकतो. अमेरिका, दुबई, पुण्यातील साहित्य संमलेनात हा मुद्दा मांडला. अंबाजोगाईला नसेल तर पैठणला करायला पाहिजे होते. रिद्धपूर हे कोणत्याच बाबतील सोयीचे ठिकाण नाही. पण राजकीय इच्छाशक्तीच नसल्यामुळे गेले विदर्भात. त्याची कोणाला खंतही वाटणार नाही.-कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद
चर्चा मराठवाड्याची होते अन्...क्रीडा विद्यापीठ असो की आणखी विकासाच्या कोणत्या योजना. त्याची चर्चा मराठवाड्यासाठी होते पण प्रत्यक्षात अंमलबजाणी दुसरीकडेच केली जाते. अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठ होण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. त्याऐवजी हे विद्यापीठ दुसरीकडेच होत आहे. मराठवाड्याच्या उपेक्षेत आणखी एका बाबीची भर पडली. हा कटू अनुभव कायमच मराठवाड्याच्या बाबतीतच येतो.- डॉ. दासू वैद्य, ज्येष्ठ कवी, गीतकार, साहित्यिक
विदर्भात पळविलेअनेक वर्षांपासून मराठवाड्यात भाषा विद्यापीठाची मागणी होती. मात्र, नेहमीप्रमाणे मराठवाड्याच्या वाट्याचे विद्यापीठ विदर्भात पळवून नेण्यात आले. रिद्धपूर हे ठिकाण महत्त्वाचे आहेच; पण मराठी भाषेच्या विकासासाठी विद्यापीठ मराठवाड्यात स्थापन होणे गरजेचे होते.- डॉ. गणेश मोहिते, भाषा अभ्यासक
सगळ्या संस्था विदर्भात पळविल्यामराठवाड्यात होणारे आयआयएम, एम्ससह इतर महत्त्वाच्या संस्था विदर्भात पळवून नेण्यात येत आहे. त्यात आणखी भाषा विद्यापीठाची भर पडली. अनेक दशकांपासून भाषा विद्यापीठ अंबाजोगाई व्हावे, अशी मागणी आहे. त्या मागणीला आधारही आहे. तरीही हे विद्यापीठ विदर्भात पळवून नेण्यात आले. हा मराठवाड्यावर ठरवून केलेला अन्याय आहे.- डॉ. नरेंद्र काळे, अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद, शाखा अंबाजोगाई