वाळूज महानगर : वाळूज उपकेंद्रात काही दिवसांपासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. केंद्रात सोमवारी गरोदर महिला व बाल रुग्णांच्या पालकांनी उपचरासाठी गर्दी केली होती. परंतु केंद्रातील कर्मचारी बबिता शिंदे यांनी औषधी उपलब्ध नसल्याचे सांगताच संतप्त महिलांनी शिंदे यांना घेराव घातला. तेव्हा वरुनच औषधी येत नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या महिला व बालकांच्या पालकांना निराश होऊन घरी परतावे लागले.
वाळूज येथील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून जिकठाण आरोग्य केंद्रांतर्गत येथे आरोग्य उपक्रेंद्र सुरु करण्यात आले आहे. या उपकेंद्रा मार्फत शासनाच्या जननी शिशू सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर माता, बालकांना उपचार करुन औषधी दिली जातात. गरोदर महिलांची रक्त, लघवी, सोनोग्राफी तपासणी. आवश्यक शस्त्रक्रिया, टीटीचे इंजेक्शन आदी सुविधा, तर बालकांसाठी पोलिओ, कावीळ आदी डोस विनाशुल्क दिले जातात.
मात्र, या उपकेंद्रात रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे. तसेच या ठिकाणी रुग्णांसाठी बसण्याची सुविधा नसल्याने गरोदर महिला व बाल रुग्णांना तासन्तास ताटकळावे लागते. काही दिवसांपासून तर औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे गरोदर महिला व बाल रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यातच अधिकारी कर्मचारीही वेळेवर येत नाहीत.
आठवड्यातून एक-दोन दिवस येणारे अधिकारी, कर्मचारी दुपारपर्यंत थांबून निघून जातात. औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांना चकरा माराव्या लागत आहेत.जिकठाण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उज्वल चव्हाण म्हणाले की, आरोग्य केंद्रात भरपूर औषधी आहेत. प्रत्येक बैठकीत याविषयी कर्मचाऱ्यांना सांगूनही ते औषधीची मागणी करीत नाहीत. वाळूज उपकेंद्रात लगेच औषधाचा पुरवठा केला जाईल.