औरंगाबाद : भालगाव येथील व्हिडीओकोन कंपनीत कंत्राटी पद्धतीवर असलेल्या जवळपास ५०० कामगारांनी थकित वेतनाच्या मागणीसाठी शनिवारी निदर्शने केली. स्थानिक पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन दिवसांत वेतन बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.
बीड रोडवरील व्हिडीओकॉन कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जवळपास शनिवारी सकाळी थकित वेतन देण्याच्या मागणीसाठी ४५० कंत्राटी कामगारांनी निदर्शने सुरु केली. कंपनी व्यवस्थापनाने शांततेचे आवाहन केले. मात्र, कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने चिकलठाणा पोलिसांना कळविण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरिक्षक सत्यजीत ताईतवाले पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा केली. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत सर्वांच्या खात्यावर पगार जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या वेळी जयभगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष शार्दुल गावंडे, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष योगेश शिंदे यांनी ठेकेदारांना खडे बोल सुनावले.