- संतोष हिरेमठऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात अत्याधुनिक, सुसज्ज आणि तज्ज्ञ असलेली प्रयोगशाळा आहे. तरीही रुग्णालयातील लॅब बंद आहे, इमर्जन्सी आहे, घाटीत ही तपासणी होत नसल्याचे कारण पुढे केले जाते. परिणामी, रुग्णांच्या रक्ताची तपासणी पैसे मोजून खाजगी लॅबचालकांकडून करून घ्यावी लागत आहे. खाजगी लॅबवाल्यांचे एजंट थेट वाॅर्डात येतात आणि पैसे घेऊन तपासणी रिपोर्ट आणून देत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला.
तपासण्यांसाठी नमुने घेऊन जाणारे, रिपोर्ट आणून देणारे, वैद्यकीय साहित्यासह विविध प्रकारची औषधी वॉर्डमध्ये आणून विकणारे एजंट घाटी रुग्णालयात पसरलेले आहेत. सकाळच्या वेळेला नमुने घेऊन जाणारे आणि संध्याकाळी रिपोर्ट आणून देणारे एजंट सर्रास दिसतात. मात्र, त्यांना कुठेही अटकाव नाही. याविषयी ‘लोकमत’ने घाटीत स्टिंग ऑपरेशन करीत परिस्थिती जाणून घेतली. तेव्हा घाटी रुग्णालयात खासगी लॅबचा धंदा अगदी जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे रुग्णालयात होणाऱ्या तपासणीसाठी अनेक रुग्णांना खाजगी लॅबचा रस्ता दाखविला जातो.
काय आढळले ‘स्टिंग’मध्ये ?घाटीतील बालरोग विभागाच्या वाॅर्डात दाखल असलेल्या एका बालकाच्या रक्त तपासणीसाठी खाजगी लॅबवाल्याला बोलावण्यात आले. दोन रक्त तपासण्यासाठी २५० रु. आकारण्यात आले. हा सगळा प्रकार मोबाइलमध्ये कैद झाला. रविवार असल्याने घाटीतील लॅब बंद आहे, असे कारण वाॅर्डातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रत्यक्षात घाटीत तपासणी सुरू होती.
रुग्णाच्या नातेवाइकांशी झालेला संवाद-प्रतिनिधी : २५० रुपये कशासाठी दिले ?- नातेवाईक : रक्ताच्या तपासणीसाठी दिले. खाजगी लॅबवाल्याला कर्मचाऱ्यांनीच बोलावले होते.- प्रतिनिधी : त्यासाठी २५० रुपये लागले का?-नातेवाईक : हो, दोन प्रकारच्या टेस्ट होत्या.- प्रतिनिधी : त्या टेस्ट घाटीत होत नाहीत का?- नातेवाईक : आज रविवार असल्याचे सांगितले, त्यामुळे खाजगीवाल्याला बोलविले.
इमर्जन्सी असेल तरचघाटीतील प्रयोगशाळा रविवारीदेखील सुरू असते. त्यामुळे बाहेरून तपासणी करण्याची गरज फारशी पडत नाही. मात्र, काही इमर्जन्सी असेल आणि तपासणी घाटीत होत नसेल तर बाहेरून करावी लागते.- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी
रविवारी रक्त तपासणी असते सुरूघाटीत रविवारीदेखील रक्त तपासणी सुरू असते. बाहेरून तपासणी करून आणण्याच्या प्रकाराविषयी आणि खाजगी लॅबच्या एजंटांबाबत आढावा घेऊ.- डाॅ. काशीनाथ चौधरी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी