औरंगाबाद : कोरोना संबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच, सानुग्रह सहाय्य लागू करण्याचा निर्णय वित्त विभागाने २९ मे रोजी घेतला. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोविड संबंधित कर्तव्य पार पाडत असल्यामुळे राज्यातील शिक्षकांनाही ५० लाख रुपयाचे विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी निवेदन सादर केले होते. असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले.
राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे ७ डिसेबर २०२०च्या नुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे शिक्षण संचालनालय (प्राथमिक) यांचे मार्फत पाठविण्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे. पत्रास अनुसरून प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी ५ जानेवारीला सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कळवले. मात्र, कर्तव्य बजावताना मृत्यू होऊनही अनेक जिल्ह्यातून संबंधित शिक्षकांचे परिपूर्ण प्रस्ताव अद्यापही प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिली. प्रस्ताव शासनाकडे तत्काळ सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. याबाबत पंचायत समिती शिक्षण विभागाला आवश्यक आदेश निर्गमित करावे, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सतीश कोळी यांनी कळविले आहे.