अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा धनादेश देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पठाण मांडवा ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका व रोजगार सेवकास येथील पंचायत समिती आवारात रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारी तीन वाजता करण्यात आली.सुनीता गंगाधर वेडे असे ग्रामसेविकेचे नाव असून येशबा चंदर मोटे हा ग्रामरोजगारसेवक आहे. पठाणमांडवा येथील मन्मथ इरे यांच्या आईच्या नावे जमीन आहे. गतवर्षी त्यांनी शेतात विहीर खोदली होती. विहिरीच्या कुशल कामांच्या देयकापोटी १ लाख १५ हजार ७५० रुपयचा धनादेश ग्रामपंचायतीत जमा होता. हा धनादेश देण्यासाठी इरे यांच्याकडे ग्रामसेविका वेडे यांनी २० हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यानंतर वेडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. दुपारी ३ वाजता ग्रामरोजगारसेवक याने इरे यांच्याकडून १० हजार रुपये स्वीकारले. यावेळी त्याला झडप मारून पकडले. ग्रामसेविका वेडे यांनाही अटक केली. शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. उपअधीक्षक भाऊसाहेब गोंदकर, निरीक्षक गजानन वाघ, पोहेकॉ श्रीराम खटावकर, अमोल बागलाने, कल्याण राठोड, राकेश ठाकूर, अशोक ठोकळ, पुरुषोत्तम बडे यांचा कारवाईत सहभाग होता. (वार्ताहर)
ग्रामसेविकेसह रोजगार सेवक लाचलुचपतच्या सापळ्यात
By admin | Published: March 22, 2016 12:01 AM