औरंगाबाद : मुस्लिमधर्मियांना इतर धर्मियांपासून धोका असल्याने भविष्यात हिंसक कृती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या घरगुती वस्तूंचा साठा करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन व्हिडीओच्या माध्यमातून करणाऱ्या ‘ तहफुझ ए दीन इंडिया’ या यु ट्यूब चॅनलचा निवेदक (अँकर) आणि यु ट्यूब मालकाविरोधात शुक्रवारी पोलिसांनी सायंकाळी गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
अँकर सय्यद फारुक अहमद आणि यु ट्यूब मालक कारी झियाउर रहमान फारुकी, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन समाजात जात, धर्मावरून तेढ, वाद निर्माण होईल, अशा प्रकारची पोस्ट, व्हिडीओ क्लीप समाजमाध्यमावर टाकणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पाेस्ट समाजमाध्यमावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांचे पथक सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. ‘ तहफुझ ए दीन इंडिया’ या यु ट्यूब चॅनलच्या व्हॉटस् ॲपवर आलेल्या व्हिडीओमध्ये निवेदक सय्यद फारूक अहमद याने शस्त्रासारखा वापर करता येऊ शकतो, अशा घरगुती वस्तूंचा साठा करण्याचे अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले. दोन समाजात, धर्मात जातीय तेढ निर्माण होईल, यादृष्टीने हा व्हिडीओ तयार करण्याचा इशारा देण्यात आला होता.
या व्हिडीओचा उद्देश पोलिसांच्या लक्षात येताच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, उपनिरीक्षक राहुल चव्हाण आणि सोशल मीडिया टीमने या ट्युब चॅनलचे कार्यालय, निवेदक आणि मालकाला शोधून काढून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात उपनिरीक्षक चव्हाण यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.