औरंगाबाद : सिडकोच्या वसाहती आणि ओपन स्पेसचे सेवा-सुविधांसाठी मनपाकडे हस्तांतरण केले खरे, मात्र त्यातील अनेक पार्किंगच्या जागांवर आॅडशेप आणि अनधिकृत धार्मिक स्थळे व व्यावसायिक हेतूने अतिक्रमणे होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचे संवर्धन करण्यात पालिकेला अपयश आले असून मनपापेक्षा सिडकोची अतिक्रमण हटाव यंत्रणा सक्षम होती. असे म्हणण्याची वेळ आली आहे. सिडको प्राधिकरणाने विविध सामाजिक उपक्रमांसाठी आरक्षित त्या भूखंडांचे सेवाभावी संस्थांकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय सिडकोने मध्यंतरी घेतला होता. मात्र पालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी सिडकोच्या त्या धोरणाला विरोध केला. सद्य:स्थितीत नाले, स्मशानभूमी, ओपन स्पेसवर होत असलेले अतिक्रमण भविष्यात नागरिकांना डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. एन-४ मधून वाहणाऱ्या नाल्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसते. कॅनॉट गार्डन, साईनगर परिसरात अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे मनपाने काढली. परंतु ती पुन्हा होत आहेत. मध्यंतरी एन-६ च्या स्मशानभूमीची जागा काही भू-माफियांच्या डोळ्यात आली होती. त्या जागेवर काँक्रीटचा मलबा आणून टाकला जात होता. सुरेवाडीतील एका धार्मिक स्थळाचे बांधकाम हे अतिक्रमण असल्याच्या वादावरून मोठा वाद झाला होता. पवननगरमध्ये आॅडशेप आणि ओपन स्पेसच्या वादातून प्रकरण घडले होते. अतिक्रमित जागा मोकळ्या करून त्यावर सिडकोने स्वत:च्या मालकीचे फलक लावले आहेत. पार्किंगसाठी असलेल्या जागांत काही ठिकाणी दुकाने झाली आहेत. त्या जागांवर झालेले अतिक्रमण काढण्याची जबाबदारी पालिकेकडे आहे.
सिडकोत पार्किंगच्या जागांवर अतिक्रमणे
By admin | Published: July 19, 2016 11:55 PM