लाडसावंगी : लाडसावंगी ते सिरजगाव घाटी रस्त्यावर काही नागरिकांनी दगड टाकून पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकड़ून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे लाडसावंगी गावातून जाणाऱ्या सिरजगाव घाटी रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चौका ते राजूर हा राज्य महामार्ग लाडसावंगी गावातून जातो. लाडसावंगीतील जि. प. हायस्कूल समोरून सिरजगाव घाटी मार्गे राजूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली आहे. आता तर वाहनांनाच नाही तर पायी जाणाऱ्यांनादेखील समस्येला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरील जि. प. शाळेच्या संरक्षण भिंतीशेजारी बकऱ्याचे गोठे, वाहने उभे करण्याचे पत्र्याचे शेड उभारले गेले आहे. त्यामुळे अरूंद रस्त्यावरही अतिक्रमण होऊ लागले आहे.
सा. बां. विभागाच्या नोटिसांना केराची टोपली
चार महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजूर चौक महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात संबंधिताना नोटिसा बजावल्या; मात्र त्या नोटिसांना केराची टोपली दाखविली गेली आहे. त्यामुळे अद्यापही अतिक्रमण काही केल्या निघेना. जि. प. शाळेपासून तीनशे मीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे; परंतु हे काम प्रत्यक्षात नेमके कधी सुरू होणार, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन लाडसावंगी-सिरजगाव घाटी रस्त्यावर टाकलेले दगड व अतिक्रमण काढून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी केली जात आहे.
090621\img_20210609_070956.jpg
ला़डसावंगी ते सिरजगाव घाटी रस्त्यावर वाहतूकीला अडथळा