औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्त्यासाठी दिलेल्या १५२ कोटी रुपये निधीतून पोलीस मेस ते कटकट गेटपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. ८१० मीटर रस्त्याचे काम झाल्यानंतर काही मालमत्ताधारकांनी दहा दिवसांपासून काम बंद पाडले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकांनी बुधवारी या भागातील १३ कच्ची अतिक्रमणे काढली. पक्की बांधकामे असलेल्या मालमत्ताधारकांनी मनपाच्या कारवाईला कडाडून विरोध दर्शविला आहे.
शहर विकास आराखड्यानुसार कटकट गेट ते पोलीस मेसपर्यंतचा रस्ता ३० मीटर करण्यात आलेला आहे. या भागातील अनेक मालमत्ताधारकांना यापूर्वी मनपा प्रशासनाकडून टीडीआर देण्यात आलेला आहे. रस्ते विकास महामंडळाने ६ कोटी ५० लाख रुपयांच्या कामाला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात केली. पोलीस मेस ते कटकट गेटपर्यंत एका बाजूने रस्त्याचे काम पूर्ण झाले. कटकट गेटपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काही मालमत्ताधारकांनी रस्त्याचे काम थांबविले. महापालिकेच्या नगररचना विभागाने मार्किंगसुद्धा करून दिली. मात्र, मालमत्ताधारक ताबा देण्यास तयार नाहीत. बुधवारी अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी-कर्मचारी कटकट गेट येथे पोहोचले. नेहमीप्रमाणे नागरिकांचा मोठा जमाव जमला. अतिक्रमण हटाव पथकाने १३ कच्ची अतिक्रमणे काढली. काही पक्की अतिक्रमणे असलेल्या मालमत्ताधारकांनी आम्ही मालमत्ता पाडून घेऊ, असे आश्वासन महापालिकेला दिले. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये, आर. एस. राचतवार, इमारत निरीक्षक मझर अली, पी. बी. गवळी, सय्यद जमशीद, रवींद्र देसाई आदींनी केली.