औरंगाबाद : महसूल विभागाने दीड वर्षांपूर्वी मिटमिटा भागात सफारी पार्कसाठी तब्बल दीडशे एकर जागा उपलब्ध करून दिली. महापालिकेनेही मोठ्या उत्साहात जागेचा ताबा घेऊन टाकला. यातील १५ एकरहून अधिक जागेवर अतिक्रमण असल्याचे समोर आले असून, संपूर्ण दीडशे एकर जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय महापालिका आणि महसूल विभागाने घेतला आहे. भूमिअभिलेख विभागातर्फे पुढील आठवड्यात दीडशे एकर जागेची मोजणी, मनपाची हद्द कुठपर्यंत आहे, हे निश्चित करण्यात येणार आहे.केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने चार ते पाच वर्षांपूर्वीच महापालिकेला सूचना केली आहे. मोठ्या जागेत प्राणिसंग्रहालय स्थलांतरित करा अन्यथा परवानगीच रद्द करण्यात येईल. महापालिकेने सध्या अस्तित्वात असलेल्या जागेत आणखी थोडीशी वाढ करून परवानगी रद्द होण्याची नामुष्की टळली होती. मात्र, हे संकट अद्याप घोंगावत आहे. मनपाने महसूल विभागाकडे यापूर्वीच दीडशे एकर जागा मिळावी, अशी मागणी केली होती. पालकमंत्री रामदास कदम यांनी जमीन मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. मिटमिटा येथील गायरान जागा मनपाला महसूल विभागाने मागील वर्षी ती हस्तांतरित करून टाकली. दीडशे एकरपैकी पंधरा एकरहून अधिक जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले. मनपाने महसूल ही जागा अतिक्रमणमुक्त द्यावी, अशी मागणी महसूल विभागाकडे केली.
मिटमिटा सफारी पार्कच्या १५ एकर जागेवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:29 AM