औरंगाबाद : मनपाच्या खुल्या जागांवर भूखंडमाफिया अतिक्रमणे करीत आहेत. अनेक रस्ते, चौकांना अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत. अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मंगळवारी सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी लवकरच एक महिना सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शहरातील अतिक्रमणांचा विषय मनपात बराच गाजत आहे. प्रत्येक सर्वसाधारण सभेत नगरसेवक आपल्या वॉर्डातील अतिक्रमणांवरून ओरड करीत असतात. आज पुन्हा एकदा अतिक्रमणांच्या विषयावर तासभर चर्चा झाली. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी पार्किंगच्या जागांचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहनेता राजेंद्र जंजाळ यांनीही बरीच ओरड केली. राज वानखेडे यांनी अतिक्रमण विभाग ठेवताच कशाला असा प्रश्न केला. अफसर खान, अब्दुल नाईकवाडी यांनीदेखील आपल्या वॉर्डातील अतिक्रमणांचे विषय मांडले. सीमा चक्रनारायण यांनी सूतगिरणी रोडवरच्या अतिक्रमणांवर कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा केली. स्वाती नागरे यांनी रस्त्यावरच खडी, वाळूसह बांधकाम साहित्याच्या ट्रॅक्टरचे अतिक्रमण असते. अनेक भाजीपाला विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसतात, अशी तक्रार केली. त्यावर आयुक्तांनी वरील आश्वासन दिले. शिक्षण विभागाचा आढावा घेणार मनपा शिक्षण विभागाचा आढावा घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पात्र शिक्षक आहेत का असा प्रश्न कैलास गायकवाड यांनी केला होता. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी शिक्षण विभागाबाबत प्रश्नांचा भडिमार केला. सीमा खरात, राज वानखेडे, आत्माराम पवार, विरोधीपक्षनेता अयुब जागीरदार, संगीता सानप, सुमित्रा हाळनोर यांनीही चर्चेत भाग घेतला.