सुनील घोडकेखुलताबाद : खुलताबाद तालुका क्रीडा संकुलाची उभारणी होऊन १४ वर्षे झालीत, परंतु ते अद्यापही सुरू न झाल्याने क्रीडा संकुलाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. आता तर चक्क क्रीडा संकुलाच्या मैदानावर अतिक्रमण होत असल्याने याकडे जिल्हा क्रीडाअधिकारी व खुलताबाद नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.खुलताबाद नगर परिषदेच्या मैदानावर २००३ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते २५ लाख रुपये खर्चाच्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन २००४-२००५ मध्ये तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले. यात मोठे इनडोअर खेळ खेळण्यासाठी हॉल व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत बांधण्यात आली. गेल्या चौदा वर्षांपासून तालुका क्रीडा संकुल प्रत्यक्षात सुरू न झाल्याने हॉल व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाची प्रचंड प्रमाणात तोडफोड झाली. दरवाजा, खिडक्या, काचा, फरशी फोडण्यात आली. त्यामुळे सदरील क्रीडा संकुल दुर्लक्षामुळे शेवटची घटका मोजत आहे.भूमाफीयांचा डोळाया क्रीडा संकुलाच्या दोन एकर मैदानावर अनेक भूमाफीयांचा डोळा असून या भूमाफीयांनी चक्क मैदानावर अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे. तालुका क्रीडा संकुलाची कोट्यवधीची जागा आज धोक्यात आली असून याबाबत जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालयाने त्वरीत लक्ष द्यावे, नसता आंदोलनाचा इशारा तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी दिला आहे.
खुलताबाद क्रीडा संकुलाच्या मैदानावरच अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:54 AM