औरंगाबाद : आमखास मैदानाच्या पाठीमागे आरेफ कॉलनीला लागून हिमायतबागेच्या तब्बल पाच एकर जागेवर सालारजंग स्टेटच्या वारसांनी काही दिवसांपूर्वी अतिक्रमण केले होते. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त केले.
परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत फळ संशोधन केंद्र (हिमायत बाग) येथील गट क्रमांक एक आणि तीनमध्ये काही दिवसांपूर्वी सालारजंग स्टेटच्या वारसांनी पाच एकर जागेवर अतिक्रमण केले होते. मागील आठवड्यात त्यांनी जमिनीला एका बाजूने लोखंडी पत्रे लावले होते. जागेच्या मध्यभागी एक लोखंडी पत्र्याची खोली उभारण्यात आली होती. चारी बाजूने सीसीटीव्ही, विजेचे मीटर, आदी सोयी-सुविधा घेण्यात आल्या होत्या. दिवसभर या जागेवर काही बाउंसर बसलेले असायचे. परभणी कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाने यासंदर्भात महसूल आणि महापालिकेकडे अतिक्रमण काढून देण्याची विनंती केली होती.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी पुन्हा जिल्हाधिकारी आणि प्रशासक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासमोर संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी आमच्याकडे न्यायालयाची ऑर्डर असल्याचे सांगितले. मात्र, त्यांचे म्हणणे ग्राह्य धरण्यात आले नाही.