वैजापूर : विरगाव मुर्शदपूरच्या माजी सरपंचाने वसतिशाळेच्या इमारतीवर अतिक्रमण करून या इमारतीचा ताबा घेतला आहे. हे अतिक्रमण काढून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
विरगाव येथील डहाके वस्तीवर वसतिशाळा असून, या वसतिशाळेला शासनाने खोल्या बांधून दिल्या आहेत. मात्र, एका माजी सरपंचाने या खोल्या बेकायदेशीरीत्या बळकावल्या आहेत. काही वर्षांपासून या खोल्यांवर अतिक्रमण झाल्याने शिक्षकाला नाईलाजाने झाडाखाली विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. या खोल्यांमध्ये जनावरे बांधली जातात, तसेच माजी सरपंच गोवऱ्या व इतर घरगुती साहित्य ठेवण्यासाठी या खोल्यांचा वापर करतात. अनेक वेळा तक्रारी करूनही काहीही उपयोग झाला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे, तसेच ग्रामपंचायतीने बचतगट व एका वाचनालयाला व्यापारी गाळे वापरायला दिले आहेत. मात्र, तेथेही बचत गट व वाचनालयाच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या हाॅटेल सुरू केले आहे. ही दोन्ही अतिक्रमणे त्वरित काढावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर रघुनाथ पुंडलीक नेद्रे, पद्माकर भागीनाथ जगधने, प्रकाश शिवाजी थोरात, दत्तू मुरलीधर औटे, सलीम पठाण, अनिल त्रिभुवन, रतन कोतवाल आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.