औरंगाबाद : गारखेडा भागातील लक्ष्मीनगरात महापालिकेच्या खुल्या जागेवर २०११ मध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून ३५ कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. तत्कालीन उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी हा डाव उधळून लावला होता. आता २०१८ मध्ये याच जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याचे काम सुरू झाले असतानाही महापालिका निव्वळ बघ्याची भूमिका घेत आहे. या भागातील सुजाण नागरिकांनी कुंभकर्णी महापालिकेला जागे करण्याचे काम सोमवारी एका निवेदनाद्वारे केले.
शिवाजीनगर रोडवर पाण्याच्या टाकीमागील गट नं. ५३ मध्ये मनपाच्या मालकीची तब्बल २ एकर जागा आहे. १९९०-९१ मध्ये महापालिकेने जलकुंभासाठी देशमुख आणि आर. पी. नाथ यांच्याकडून दोन एकर जागा घेतली होती. या जागेवर महापालिकेने पाण्याची टाकीही बांधली आहे. २०११ मध्ये मनपाच्या जागेवर चक्क प्लॉटिंग पाडण्यात आली होती. देसरडा यांनी प्लॉटिंग पाडल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी भूमाफियांचा डाव उधळून लावला होता.
तब्बल सात वर्षांनंतर या जागेवर डोळा असलेल्या मंडळींनी पुन्हा कामाला सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून या जागेवर टोलेजंग इमारत उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. अतिशय वेगाने हे काम सुरू आहे. या भागातील नागरिक विजय शिरसाट यांनी मनपाकडे तक्रार केली. १२ आॅक्टोबर रोजी मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाचे पथकही तेथे पोहोचले. क्षणार्धात एका फोनवरून पथक परतले. १५ आॅक्टोबर रोजी शिरसाठ यांनी थेट महापालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे विविध पुराव्यंसह तक्रार दिली.