छत्रपती संभाजीनगर: शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम करणे अब्दीमंडीचे सरपंच साबेरखान सिराज खान पठाण आणि उपसरपंच शगुप्ता साबेरखान पठाण या दाम्पत्याच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी दाखल अपीलावर निर्णय देताना विभागीय आयुक्तांनी सरपंच आणि उपसरपंच पती, पत्नीला पदावर राहण्यास अपात्र ठरविणारा आदेश दिला.
मूळ तक्रारदार शेख सिराज शेख तमिजोद्दीन यांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करून अब्दीमंडी ग्रामपंचायतीचे सरपंच साबेरखान आणि उपसरपंच शगुप्ता पठाण यांनी व त्यांची आई फरजानाबी सिराजखान पठाण यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेत. त्यांच्या मालकीची १५ बाय ६४ चौरस फुट असताना त्यांनी १५ बाय ९५ चौ.फुट क्षेत्रफळावर आर.सी.सी. बांधकाम करून घर बांधले आहे. हे बांधकाम करताना त्यांनी ग्रामंपचायतकडून बांधकाम परवाना घेतलेला नाही. यामुळे त्यांना सरपंच आणि उपसरंच पदावरून अपात्र करण्याची विनंती करण्यात करण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी सुनावणी घेऊन १७फेब्रुवारी रोजी सिराज शेख यांचा अर्ज नामंजूर करणारा निर्णय दिला. यानंतर तक्रारदार सिराज यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात अप्पर विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात ॲड. चंद्रकांत व्ही. बोडखे यांच्यामार्फत अपील दाखल केले. या अपीलावर अप्पर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली. यावेळी भावसिंगपुऱ्याचे मंडळ अधिकारी यांच्या अहवालात सरपंच आणि उपसरपंच दाम्पत्याने शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. अतिक्रमित क्षेत्र लपविण्यासाठी दाम्पत्याने कागदपत्रावर फेरबदल करून केल्याचे नमूद केले. उभय पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर अप्पर विभागीय आयुक्तांनी सरपंच साबेरखान सिराज खान पठाण आणि उपसरपंच शगुप्ता साबेरखान पठाण या दाम्पत्याला पदावर राहण्यास अपात्र ठरविण्याचा आदेश दिला.