हिंगोली : येथील रामलीला मैदानावरील अतिक्रमण महसूल व नगरपालिकेच्या वतीने शनिवारी सकाळी सात वाजेपासूनच हटविण्यास सुरुवात केली. अतिक्रमणधारकांना अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांनी न काढल्याने थोडाही वेळ न देता थेट मोडतोड करण्यात आली.पालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटविण्याचा मुर्हूत ४ जुलै रोजी निश्चित झाला होता. परंतु याच दिवशी आषाढी एकादशी असल्याने संपूर्ण पोलीस बंदोबस्त नर्सी येथे लावला गेल्याने, त्या दिवशीचा मुहूर्त टळला होता. पालिकेतर्फे काढण्यात येणाऱ्या अतिक्रमणाची अजूनही तारीखी निश्चित झालेली नसली तरी महसूल विभागाने मात्र शनिवारी अगदी सकाळी सात वाजेपासूनच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांना पळता भुई थोडी झाली होती. मैदानावर दगडा पोलीस बंदोबस्त असल्याने अतिक्रमणधारक आपलेच दुकान असल्याचे सांगण्यासही घाबरत होते. अतिक्रमण हटाव मोहीम सुरु असतानाच काही अतिक्रमणधारक धाडस करुन दुकानातील साहित्य इतरत्र हलविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आॅटो, टेम्पो, हातगाडा, बैलगाडी अशा मिळेल त्या वाहनाचा आधार घेत जिवाच्या आकांताने त्यांची खटाटोप सुरू होती. तर दुसरीकडे जसजसा जेसीबी जवळ येत होता, तशी काळजात धडकी भरत होती. यात अनेकांनी केवळ महागड्या वस्तू वाचविण्याचा प्रयत्न केला. जेसीबीसमोर जे दुकान येईल, त्याचा संपूर्ण नायनाट केला जात होता. अनेक खोके तर जागीच दाबले. पत्र्याचे शेड पाडले. लोखंडी पक्के शेडही यात धाराशाही पडले. अतिक्रमणावर जेसीबी फिरविल्यानंतर नागरिक बोंब ठोकत होते. मात्र पोलीस सतर्क व तगड्या संख्येत असल्याने काहीच तरणोपाय नव्हता. काहीजण तर बस्तान हलविताना पडून जखमीही झाले. तसेच या ठिकाणी मोठा जमाव जमला होता. सकाळी सात वाजता सुरु झालेली अतिक्रमण मोहीम दुपारी १ च्या सुमारास शांत झाली होती. नेहमीच गजबजणाऱ्या रामलीला मैदानावरील दुकाने हटविल्याने, मोकळे मैदान तयार झाले. मात्र जेसीबीच्या साह्याने नुकसान झालेल्या दुकानाचे साहित्य रात्री उशिरापर्यंत अतिक्रमणधारक गोळा करीत होते. तर काही आहे त्या अवस्थेत सोडून आपले साहित्य नेण्यासाठी धावपळ करीत होते. अनेकांनी तर आ. तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे धाव घेतल्याने आ. मुटकुळे हे रामलीला मैदानावर आले होते. तोपर्यंत अर्ध्यावर अतिक्रमण हटविले होते. त्यामुळे काहीच निर्णय घेता आला नाही. सगळीकडे टपऱ्या नेणारी वाहनेअतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असताना शहरातील सर्वच रस्त्यांवर टपऱ्या वाहून नेणारीच वाहने, हातगाडे दिसत होते. आता यापुढे व्यवसाय कसा व कुठे करायचा, या चिंतेत हे ओझे वाहून नेत ही मंडळी डोळ्यातून आश्रुही ढाळत होती. मात्र अतिक्रमण करूनच बस्तान असल्याने कैफियत तरी मांडायची कुठे, हाही प्रश्नच होता.
रामलीला मैदानावरील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:33 AM