वाळूज महानगर : रांजणगाव-जोगेश्वरी व रांजणगाव कमळापूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन विविध व्यवसाय थाटले आहेत. मात्र याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने हे अतिक्रमण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
रांजणगावातून जोगेश्वरी व कमळापूरकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर फळ-भाजीपाला विक्रेते व हातगाडीवाले व्यवसायिकांनी अतिक्रमण करुन व्यवसाय सुरु केला आहे. जोगेश्वरी रस्ता तर व्यवसायिकांनी व्यापला आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले आहेत. रहदारीचे हे मुख्य रस्ते असल्याने या रस्त्यावर कामगारासह नागरिकांची वर्दळ असते. तसेच ग्रामपंचायत कार्यालयही याच रस्त्यावर आहे. त्यामुळे विविध कामानिमित्त नागरिकांची दिवसभर ये-जा असते. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने कायम वाहतूकीचा खोळंबा होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या घटना घडत असून, वाहनधारकांना पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा-अर्धा तास ताटकळावे लागत आहे. सायंकाळच्या वेळी तर रस्ता पूर्ण जाम होत असल्याने पादचाºयांना पायी चालणे देखील अवघड झाले आहे. दररोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मध्यंतरी स्थानिक ग्रामपंचायतीने रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरील अतिक्रमण हटविले होते. पण ग्रामपंचायतीची मोहीम थंडावताच रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण झाले. वाढत्या अतिक्रमणामुळे जोगेश्वरी व कमळापूर रस्त्यावर ये-जा करणे अवघड झाले आहे. वाहनधारकांना तर वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेवून अतिक्रमणा विरोधात मोहिम राबवावी. रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करावा. अशी मागणी या परिसरातील त्रस्त नागरिकांमधून केली जात आहे.