करमाड : जालना मार्गावरून गावात जाणाऱ्या मुख्य मार्गावर दोन्हीही बाजूला भाजीपाला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला असून , अपघाताची शक्यता आहे.
करमाड येथे दररोज मंडी भरत असल्याने ग्राहकांना सोयीचे व्हावे यासाठी भाजी विक्रेत्यांसाठी ग्रामपंचायतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जागा दिली आहे. परंतु दिवसेंदिवस भाजीपाला विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याने त्यांनी आता गावातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.
दररोज सायंकाळी भाजीपाला घेण्यासाठी याठिकाणी ग्राहकांची गर्दी होते. याच ठिकाणी गावात जाणारा मुख्य रस्ता असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. भाजीपाला विक्रेते मुख्य रस्त्यावर बसल्याने वाहनचालकांना याठिकाणी कसरत करावी लागते.
यापूर्वी आठवडी बाजारात आलेल्या दोन महिलांना ट्रकने चिरडले होते. त्यानंतर पोलिसांनी बाजार जालना मार्गाच्या आत स्थलांतरित केला होता. आताही गावातील मुख्य मार्गावर मंडी भरत असल्याने रस्ता अरुंद झाला असून, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा रस्ता मोकळा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.