छत्रपती संभाजीनगर : टाऊन हॉल जय भीमनगर ते मकाई गेट हा रस्ता शहर विकास आराखड्यानुसार ८० फूट रुंद आहे. बाधित रस्त्यातील अतिक्रमणे काढण्याचे काम मनपाने शुक्रवारपासून सुरू केले. दिवसभरात सात मालमत्तांवर कारवाई करण्यात आली.
महापालिकेने यापूर्वी सात मालमत्ता जमीनदोस्त केल्या होत्या. दरम्यान, या भागातील मुख्य रस्त्याचे काम थांबले. रस्त्यात बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांनी आपली अतिक्रमणे काढली नाहीत. प्रशासनाकडे नागरिकांनी रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, म्हणून निवेदने दिली. दोन दिवसांपूर्वी या भागात नागरिकांच्या आक्षेपानुसार मार्किंगसुद्धा करण्यात आली होती. अब्दुल वहीद यांचे दहा बाय दहा आकाराच्या दोन खोल्या आज तोडण्यात आल्या. प्रारंभी मालमत्ताधारकाने कारवाईला विरोध केला; परंतु, त्यांची समजूत काढण्यात आली.
सामान काढण्यासाठी मालमत्ताधारकाने वेळ देण्याची विनंती केली. एक तासाचा वेळ देण्यात आला; परंतु, त्यांनी आपले सामान काढले नाही, उलट कारवाईस विरोध सुरू केला. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त सविता सोनवणे यांना अतिक्रमण हटाव पथकाने माहिती दिली. सोमवारपासून पुन्हा कारवाई सुरू होणार आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत वॉर्ड अधिकारी संजय सुरडकर, इमारत निरीक्षक सय्यद जमशेद, रामेश्वर सुरासे, रवींद्र देसाई आदींची उपस्थिती हेाती.