वाळूज महानगर : पंढरपुरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. फूटपाथबरोबरच अर्ध्या रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी कब्जा केल्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे.
जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने दशकभरापूर्वी औरंगाबाद-अहमदनगर या महामार्गाचे गोलवाडी फाटा ते वडाळापर्यंत चौपदरीकरण करण्यात आले आहे. या चौपदरीकरणामुळे सतत होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून वाहनधारकांची सुटकाही झाली होती. मात्र कालांतराने पंढरपुरात विविध व्यावसायिकांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे करून व्यवसाय थाटले. आजघडीला या रस्त्याच्या दोन्ही बाजूने गॅरेज, हॉटेलचालक, हातगाडीवर व्यवसाय करणारे, कापड दुकानदार आदींसह विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. हा प्रमुख महामार्ग असल्यामुळे या रस्त्यावर रात्रं-दिवस वाहनांची वर्दळ असते. मात्र रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारक व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या अतिक्रमणांमुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत व जागतिक बँक प्रकल्पाचे अधिकारीही कानाडोळा करीत असल्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिली होती. मात्र नशीब बलवत्तर असल्याने दुचाकीस्वार दाम्पत्य बचावले. या अपघातानंतर ट्रकखाली अडकलेल्या दुचाकीला ट्रकचालकाने जवळपास ५० मीटरपर्यंत फरपटत नेले. या महामार्गावरील अतिक्रमणांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने अपघात वाढत असल्याची ओरड वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.
१०० फुटाचा रस्ता; अतिक्रमणांमुळे झाला अरुंद
जागतिक बँक प्रकल्पाच्यावतीने दशकभरापूर्वी बीओटी तत्त्वावर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. गोलवाडी फाट्यापासून वडाळ्यापर्यंत हा महामार्ग ३० मीटरचा (जवळपास १०० फूट) झालेला आहे. दुभाजकापासून प्रत्येकी १५ मीटरचा हा रस्ता असून दोन्ही बाजूने व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. विशेष म्हणजे पार्किंगसाठी ६ मीटरची जागा सोडलेली असून पार्किंगची जागाही व्यावसायिकांनी गिळंकृत केली आहे. या रस्त्यावरील फूटपाथही गायब असून मुख्य रस्त्यावर अनेकांनी व्यवसाय थाटल्यामुळे हा १०० फुटांचा रस्ता ७० फुटांचा उरला आहे. परिणामी रस्ता अरुंद झाल्याने या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
प्रतिक्रिया...
अतिक्रमणे रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची
अतिक्रमणे रोखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण धारकांना अभय दिले जात असल्यामुळे या रस्त्यावर दुतर्फा अतिक्रमणे झाली असून, अपघाताचा धोका बळावला आहे.
- एम. एन. कानडे (शाखा अभियंता, जागतिक बँक प्रकल्प)
------------
अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावणार
पंढरपुरात अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताच्या घटना वाढत आहेत. मुख्य रस्त्यावर वाहने उभी करणारे दुकानदार तसेच अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना ग्रामपंचायतीकडून नोटिसा बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
- हरिष आंधळे (ग्रामविकास अधिकारी, पंढरपूर)
फोटो ओळ
पंढरपुरात मुख्य रस्त्यावर अशाप्रकारे विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याने रस्ता अरुंद झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे.