औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याची साडेसाती संपण्याचे नाव घेत नाही. पाणीपुरवठ्याला शनि वक्री झाल्यामुळे मागील १० दिवसांपासून रोज काही ना काही तांत्रिक घटना घडत आहेत. परिणामी शहरात कुठे निर्जळी तर कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. २९ रोजी पहाटे ३ वा. एक पंप बंद पडला होता. तो पंप सायंकाळी ५ वा. सुरू झाला. त्यामुळे ३० रोजी शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा उशिरा होणार आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचे इन्फ्रास्ट्रक्चर जुने झाल्यामुळे तेथे महिनाभरात चार-पाच वेळा तांत्रिक बिघाड होतो आहे. त्या बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी असून, कंपनीने चार महिन्यांत यंत्रणेसमोर हात टेकले आहेत. फारोळ्यातील जलशुद्धीकरण पंप ९ तास बंद राहिल्यामुळे सिडको-हडको व शहरातील काही भागांत उशिरा पाणी येणार आहे. दरम्यान, आयुक्त पी.एम.महाजन यांनी नक्षत्रवाडी, फारोळा ते जायकवाडीपर्यंत जलवाहिनी, पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले, पाच पंप सुरूआहेत, मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. फारोळ्यात नवीन व जुन्या योजनेचा फिल्टर प्लांट आहे. तसेच रॉ-वॉटरचा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा आहे. ही सगळी यंत्रणा जुनी झाली आहे. १० दिवसांपासून गुंठेवारी वसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे वेळापत्रक कोलमडले आहे. नळ कनेक्शन असलेल्या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा न झाल्यास तेथे टँकर पाठविण्यात आल्यामुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा न झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.
पाणीपुरवठ्याची साडेसाती संपेना
By admin | Published: December 30, 2014 1:01 AM